मुंबई - बॉलिवूड अभिनेता सलमान खानने नुकतीच मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. भेटीनंतर सलमान खानने शस्त्र परवान्यासाठी अर्ज केल्याची बातमी समोर आली. पण, संघर्ष नावाच्या एका संघटनेने याप्रकरणी मुंबई पोलिसांना पत्र लिहून सलमानला शस्त्र परवाना न देण्याची मागणी केली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी सलमानला शस्त्र परवाना मंजूर केला आहे. दरम्यान, सलमानला काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.
बिश्नोई गँगकडून सलमान खानला 'मूसेवाला जैसा हाल करेंगे' अशी धमकी दिली होती. त्यामुळे, सलमानच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर सलमानने मुंबई पोलिसांकडे शस्त्र परवाना बाळगण्याची परवानगी मागितली होती. 22 जुलै रोजी यासंदर्भात त्याने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फनसालकर यांची भेट घेतली होती. तसेच, सलमानच्या खसगी सुरक्षा व्यवस्थेही मोठे बदल करण्यात आले आहेत. आता, सलमानला शस्त्र बाळगण्याचा परवाना मंजूर झाल्याचं मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
सलमानने केला होता पोलिसांकडे अर्ज
सलमान खानने शुक्रवारी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयात भेट घेतली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानने शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता. मात्र, पोलीस आयुक्त हे आपले जुने मित्र असून आपण त्यांचे अभिनंदन करण्यासाठी गेलो होतो, असे सलमानने यावेळी सांगितले होते.
बिश्नोई गँगकडून धमकी
गेल्या महिन्यात सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते. यानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली. लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचे बोलले जात आहे. यामुळेच सलमान खानने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन शस्त्र परवाना देण्याची मागणी केल्याची बातमी मीडियातून प्रसिद्ध झाली.