बॉलिवूडचा भाईजान असलेल्या सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर रविवारी(१४ एप्रिल) दोन अज्ञातांनी हवेत गोळीबार केल्याने परिसारात खळबळ उडाली होती. याप्रकरणी FIR दाखल केल्यानंतर तपास सुरू केला आहे. घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर भाईजानला त्याच्या कुटुंबीयांची चिंता सतावत होती. पण, या प्रकरणावर अद्याप त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर सलमान खानने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
भाईजानने इन्स्टाग्राम एक व्हिडिओ पोस्ट करत Being Strong असं म्हटलं आहे. या व्हिडिओत सलमान एकदम फिट दिसत आहे. गोळीबार प्रकरणानंतर सलमानला सुरक्षित पाहून चाहतेही खूश झाले आहेत. सलमानने हा व्हिडिओ शेअर करत दुबईत त्याचा Being Strong हा ब्रँड लाँच झाल्याचं सांगितलं आहे. "मीदेखील Being Strong चे इक्विपमेंट्स वापरतो. माझ्या मित्रांनीही ती खरेदी केली आहेत. आता दुबईतही या ब्रँडची उपकरणे मिळणार आहत," असं सलमान व्हिडिओत म्हणताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
घराबाहेर गोळीबार प्रकरणानंतर सलमानने त्याच्या रुटीनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. सिनेमांच्या शेड्यूलप्रमाणे तो ठरलेल्या वेळेनुसारच काम करणार असल्याची माहिती त्याच्या जवळच्या व्यक्तींकडून मिळाली आहे. याआधीही अनेकदा सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. बिश्नोई गँगकडून सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आता या प्रकरणातही बिश्नोई गँगचा हात आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.