लव यात्री या चित्रपटात आयुष शर्मा आणि वरीना हुसैन हे दोन नवे कलाकार बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती सलमान खानची आहे. आयुष हा सलमानची लाडकी बहीण अर्पिताचा नवरा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सलमानच्या वांद्रे येथील गॅलॅक्सी अर्पार्टमेंटमध्ये त्याने पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्याच्याशी मारलेल्या गप्पा...
प्राजक्ता चिटणीस
लव यात्री या चित्रपटाच्या प्रमोशनपासून तू सुरुवातीपासून दूर राहिला आहे, याचे काही खास कारण आहे का?हे खरं आहे की, लव यात्री या चित्रपटाच्या प्रमोशनमुळे मी सुरुवातीपासून दूर राहिलो आहे. हिरो या चित्रपटाद्वारे मी सुरज पांचोलीला लाँच केले होते. या चित्रपटाचे प्रमोशन देखील मी केले होते. तसेच या चित्रपटासाठी मी एक गाणे देखील गायले होते. पण तरीही चित्रपटाला तितकेसे यश मिळाले नाही. चित्रपटाला यश मिळणे अथवा न मिळणे हे सर्वस्वी प्रेक्षकांच्या हातात असते. आयुष हा गेल्या अनेक वर्षांपासून मेहनत घेत आहे. त्यामुळे मी नसतो, तर त्याला कोणीतरी लाँच केलेच असते. मी प्रमोशन करत नसल्याने मी आयुषला पाठिंबा देत नाही असे देखील आर्पिताला वाटले असेल. प्रमोशनपेक्षा देखील प्रेक्षकांना चित्रपट किती आवडतो यावर चित्रपटाचे भविष्य ठरलेले असते. पण हा चित्रपट आणि त्यातील आयुष, वरिनाचा अभिनय प्रेक्षकांना आवडेल अशी मला आशा आहे.
तू आजवर अनेकांना बॉलिवूडमध्ये लाँच केले आहेस, तुला तुझ्या पहिल्या चित्रपटाचा पहिला शुक्रवार आठवतो का?मैंने प्यार किया हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्यावेळी मी माझ्या एका मित्रासोबत मिनरवा थिएटरला गेलो होतो. आम्ही चित्रपट सुरू झाल्यानंतर थोड्या वेळात चित्रपटगृहाच्या आत गेलो. चित्रपटाच्या मध्यंतराच्या वेळी काही लोकांनी मला ओळखले. त्यांनी माझ्याभोवती गराडा घालायचा प्रयत्न केला होता. मी आणि माझा मित्र धावतच तिथून बाहेर गेलो. त्याची बाईक स्टार्ट करायचा आम्ही दोघांनी प्रयत्न केला. पण ती पटकन स्टार्ट होत नव्हती. आम्ही तिथून कशी धूम ठोकली हे केवळ आम्हालाच माहिती आहे. पण तेव्हाच प्रेक्षकांचा माझ्या चित्रपटाला असलेला रिस्पोन्स कसा आहे हे मला कळले होते.
तू गेली अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये आहेस, तू या क्षेत्रात येणाऱ्या नवीन पिढीला काय सल्ला देशील?मी त्यांना एकच सांगेन, डू व्हॉटेव्हर यू वाँट... बॉलिवूडमध्ये आल्यानंतर तुमच्याकडे संयम असणे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे काम नसल्यास तुम्हाला नक्कीच निराशा येते. पण हताश होऊ नका... आज टिव्ही, चित्रपट, वेबसिरिज अशी अनेक माध्यमं आहेत. तुम्हाला नक्कीच काम मिळेल आणि त्यातही काम मिळत नाहीये म्हणून काहीही काम करू नका... केवळ चांगलेच काम करा.
लव यात्री या चित्रपटाच्या शीर्षकावर चांगलाच वाद झाला होता, त्याबद्दल काय सांगशील?कोणत्याही चित्रपटाच्या शीर्षकावरून चित्रपट चालत नाही. चित्रपटाच्या शीर्षकावरून चित्रपट चालला असता तर केवळ शीर्षकच लोकांना दाखवण्यात आले असते. आमच्या पहिल्या शीर्षकामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या जात आहे याची जाणीव झाल्यानेच आम्ही हे शीर्षक बदलण्याचा निर्णय घेतला. शीर्षकात काही बदल झाल्याने त्याचा चित्रपटावर परिणाम होईल असे मला वाटत नाही.