कलाविश्वात असे बरेचसे कलाकार आहेत जे नशीबावर विश्वास ठेवतात. त्यामुळे शिल्पा शेट्टीपासून (shilpa shetty) सलमान खानपर्यंत (salman khan) अनेक कलाकार त्यांच्या जवळ गुडलूक असलेल्या वस्तू ठेवतात. यात सलमान खानचं ब्रेसलेट तर साऱ्यांनाच ठावूक आहे. कित्येक वर्षांपासून सलमान त्याच्या हातात निळा खडा असलेलं ब्रेसलेट घालून आले. विशेष म्हणजे चित्रपटाचं शुटिंग सुरु असतानाही तो हे ब्रेसलेट कधीच त्याच्या हातातून काढत नाही. त्यामुळे हे ब्रेसलेट भाईजानसाठी इतकं खास का आहे असा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो. या प्रश्नाचं उत्तर स्वत: सलमाननेच एका कार्यक्रमात दिलं होतं.
सलमानने त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात केल्यापासून हे ब्रेसलेट त्याच्या हातात आहे. हे ब्रेसलेट त्याच्या वडिलांनी म्हणजेच सलीम खान यांनी त्याला दिलं होतं. विशेष म्हणजे वडिलांनी दिलेलं हे ब्रेसलेट सलमानला निगेटिव्ह एनर्जीपासून दूर ठेवतं असा त्याचा विश्वास आहे.
सोशल मीडियावर सध्या सलमानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने ब्रेसलेटविषयी भाष्य केलं आहे. "माझे वडील सलीम खान कायम हे ब्रेसलेट परिधान करायचे. त्यांच्या हातात हे फार कूल दिसायचंय. लहान असताना मी या ब्रेसलेटसोबत कायम खेळायचो. ज्यावेळी मी फिल्मी करिअरला सुरुवात केली त्यावेळी सेम तसंच ब्रेसलेट त्यांनी मला गिफ्ट केलं", असं सलमान म्हणाला.
पुढे तो म्हणतो, " या ब्रेसलेटमध्ये असलेल्या खड्याला फिरोजा म्हणतात. दोनच लिव्हिंग स्टोन आहेत. एक अकीक आणि दुसरा फिरोजा (turquoise). त्यापैकी फिरोजा माझ्याकडे आहे. या खड्याला नकारात्मक ऊर्जा लगेच जाणवते. त्यामुळे जेव्हा कधी माझ्यासोबत काही चुकीचं किंवा नकारात्मक होणार असेल त्यावेळी हा खडा आपोआप तुटतो. हा माझा ७ वा खडा आहे."
दरम्यान, 'वॉटेंड', 'दबंग', 'तेरे नाम' अशा कितीतरी चित्रपटांमध्ये सलमानच्या हातात हे ब्रेसलेट पाहायला मिळालं आहे. सलमान कधीच त्याचं ब्रेसलेट हातातून काढत नाही. सलमान सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. लवकरच तो 'पठाण'मध्ये कॅमियो रोल करणार आहे. तसंच 'टायगर ३' मध्ये तो कतरिना कैफसोबत झळकणार आहे. इतकंच नाही तर त्याचा 'कभी ईद कभी दिवाली' हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.