सलमान खानच्या आगामी 'सिकंदर' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमाचा टीझर काहीच दिवसांपूर्वी रिलीज झाला. या टीझरपासूनच 'सिकंदर' पाहण्याची सर्वांना उत्सुकता आहे. 'सिकंदर' सिनेमा ईदच्या मुहुर्तावर रिलीज होणार हे आधीपासूनच ठरलेलं होतं. परंतु 'सिकंदर'चा ईदचा रिलीज डेटचा मुहुर्त टळणार असल्याची शक्यता निर्माण झालीय. या गोष्टीला एक सुप्रसिद्ध अभिनेत्री कारण ठरलीय. ती अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना. काय घडलंय नेमकं?
रश्मिका अजूनही दुखापतीतून सावरली नाही
'सिकंदर' सिनेमा ईदच्या मुहुर्तावर रिलीज होणार होता. परंतु रश्मिकाला दुखापत झाल्याने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आलीय. सध्या सिनेमाचं शूटिंग सुरु आहे परंतु रश्मिकाच्या सीनचं शूटिंग सध्या लांबणीवर पडलंय. अशातच आज रश्मिकाचा हैदराबाद एअरपोर्टवरील व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओत रश्मिका व्हीलचेअरवर बसली असून ती गाडीतून लंगडत उतरताना दिसतेय. त्यामुळे अजूनही दुखापतीतून रश्मिका सावरलेली दिसत नाहीये. त्यामुळेच 'सिकंदर'च्या शूटिंगला रश्मिकामुळे उशीर होत असल्याची शक्यता आहे.
'सिकंदर'चा ईदचा मुहुर्त टळणार
साजिद नाडियादवाला निर्मिता ए. आर. मुरुगोदास दिग्दर्शित 'सिकंदर' सिनेमात सलमान खान प्रमुख भूमिकेत आहे. तर त्याच्यासोबत रश्मिका मंदाना झळकणार आहे. २०२५ मध्ये ईद मार्चच्या शेवटच्या आठवड्यात अर्थात ३०, ३१ मार्चला आहे. रश्मिकाचं शूटिंग लांबलं तर सिनेमाच्या पुढील सर्व प्रोसेसला वेळ होईल. त्यामुळे रश्मिकामुळे 'सिकंदर'चा ईदचा मुहुर्त टळणार की सिनेमा वेळेत रिलीज होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.