सलमान खान पुन्हा एकदा प्रेम बनून परतणार आहे. होय, २०११ मध्ये आलेल्या आणि लोकांनी डोक्यावर घेतलेल्या ‘रेडी’ या चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ताज्या चर्चेनुसार, निर्माता भूषण कुमार आणि दिग्दर्शक अनीस बज्मी यांची यासंदर्भात सलमानसोबत चर्चा सुरु आहे. भूषण कुमार यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. माझ्या प्रॉडक्शन हाऊसने अतुल अग्निहोत्रीसोबत मिळून ‘भारत’चे शूटींग सुरू केले आहे. आता सलमान व अनीस यांच्यासोबत ‘रेडी2’वर चर्चा सुरु आहे. आम्हाला केवळ चांगल्या स्क्रिप्टचा शोध आहे, असे त्यांनी सांगितले. अनीस अज्मी हे सुद्धा ‘रेडी2’बद्दल उत्सूक दिसलेत. मी या प्रोजेक्टवर काम सुरू करण्यासाठी आणखी प्रतीक्षा करू शकत नाही. गेल्या काही महिन्यांपासून भूषण कुमार यांच्यासोबत माझी चर्चा सुरु आहे. पण अलीकडे झालेल्या चर्चेत सगळे काही जुळून येईल असे दिसतेय. अद्याप सलमानसोबत अंतिम चर्चा झालेली नाही. सगळे काही त्याच्या डेट्सवर अवलंबून असेल, असे ते म्हणाले.तूर्तास ‘रेडी2’च्या सीक्वलमध्ये कोण असणार, हे स्पष्ट झालेले नाही. ‘रेडी’मध्ये सलमानसोबत असिन दिसली होती. हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता.तूर्तास सलमान खान ‘भारत’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. कोरियन चित्रपट ‘ओड टु माय फादर’चा रिमेक असलेल्या या चित्रपटात सलमानसोबत प्रियांका चोप्रा आणि दिशा पाटनी मुख्य भूमिकेत आहेत.