Join us

या अभिनेत्रीचे खरे नाव आहे आलिया, सलमान खानच्या सांगण्यावरून बदलले नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 1:01 PM

या अभिनेत्रीच्या गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड मोडले.

ठळक मुद्देकियाराने सांगितले होते की, माझे खरे नाव आलिया आहे. पण आलिया भट ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये असल्याने सलमान खानने मला नाव बदलण्याचे सुचवले.

कियारा आडवाणीने फग्ली या चित्रपटापासून तिच्या करियरला सुरुवात केली. त्यानंतर मशिन या चित्रपटात ती झळकली. या दोन्ही चित्रपटामुळे तिला म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही. लस्ट स्टोरी या चित्रपटामुळे प्रेक्षकांनी तिची चांगलीच दखल घेतली. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता एम एस धोनीः द अन्टोल्ड स्टोरी या चित्रपटामुळे मिळाली. तिच्या गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या कबीर सिंग या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. या चित्रपटामुळे तिची लोकप्रियता प्रचंड वाढली. तसेच अक्षय कुमार, करिना कपूरच्या मुख्य भूमिकेत असलेल्या गुड न्यूज या चित्रपटात देखील ती झळकली होती.

बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याआधी अनेक अभिनेत्री आपल्या नावामध्ये बदल करतात असेच काहीसे कियाराने केले आहे. कियारा आडवाणीचे खरे नाव कियारा नसून आलिया असल्याचे खूपच कमी जणांना माहीत आहे. तिने तिचे हे नाव इंडस्ट्रीत येण्यासाठी बदलले. पण तिने हे नाव बदलण्यामागे एक खास कारण आहे आणि विशेष म्हणजे हे नाव बदलण्यामागे बॉलिवूडमधील एक अभिनेता आणि अभिनेत्री आहे. नाव बदलण्यामागचे कारण तिने वुट वरील फिट अप विथ स्टार्स सिझन 2 मध्ये सांगितले होते.

कियाराने सांगितले होते की, माझे खरे नाव आलिया आहे. पण आलिया भट ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये असल्याने सलमान खानने मला नाव बदलण्याचे सुचवले. सलमानचे म्हणणे होते की, एकाच नावाच्या दोन अभिनेत्री बॉलिवूडमध्ये असू शकत नाहीत. त्याने मला नाव बदलायला सुचवले असले तरी नवीन नाव काय ठेवायचे हे मी ठरवले. कियारा हे नाव मला आवडत असल्याने मी कियारा या नावाने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. आता तर माझे आई-वडील देखील मला आलिया नव्हे तर कियारा या नावाने हाक मारू लागले आहेत.

प्रियांका चोप्राच्या अंजाना अंजानी या चित्रपटात तिचे नाव कियारा होते. या चित्रपटात ती हाय आय अ‍ॅम कियारा हे ज्या पद्धतीने बोलते ते कियाराला खूपच आवडले होते. त्यामुळे भविष्यात माझ्या मुलीचे नाव कियारा ठेवेन असे कियाराने ठरवले होते. बॉलिवूडमध्ये प्रवेश करताना नाव बदलण्याचा ज्यावेळी विषय निघाला, त्यावेळी कियाराने विचार केला की, मला कियारा हे नाव इतके आवडते तर मी हेच नाव का नको ठेवू...

टॅग्स :कियारा अडवाणी