पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई करत, पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेच्या तळावर १००० किलो वजनाचा बॉम्ब फेकला. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आत्तापर्यंत सर्वांत मोठी कारवाई आहे. भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत जवानांवर केलेल्या हल्ल्याला चोख उत्तर दिलं आहे.
भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचे बॉम्ब फेकले. १२ मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या हल्ल्यात जवळपास ३०० दहशतवादींना ठार करण्यात आले आहे. ठार करण्यात आलेल्यांमध्ये जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचा मेहुणा युसूफ अझहरचाही समावेश आहे. या कारवाईनंतर भारतीय वायूसेना, सैन्य आणि सरकारचे सर्वत्र कौतुक होत आहे. बॉलिवूडही यात मागे नाही. अनुपम खेर, परेश रावल, मुग्धा गोडसे, अभिषेक बच्चन, अजय देवगण, अक्षय कुमार अशा अनेक बॉलिवूड स्टार्सनी भारतीय वायुसेनेना सलाम केला आहे.
बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानने देखील ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सलमानने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, इंडियन एअर फोर्स तुमचा आम्हाला अभिमान आहे. जय हो!