अनेक प्रयत्नानंतरही कोरोना व्हायरसचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतोय. कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. लॉकडाऊनमुळे सगळे काही ठप्प आहे आणि अशात अनेक लोकांपुढे जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालाय. हजारो लोकांना पोसणारी बॉलिवूड इंडस्ट्रीलाही याचा फटका बसला आहे. शूटींग बंद आहे, नव्या चित्रपटाचे रिलीज अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. साहजिकच बॉलिवूड इंडस्ट्रीतील रोजंदारीवर काम करणा-या शेकडो कामगारांची स्थिती बिकट आहे. अशात बॉलिवूडचे अनेक स्टार्स या कामगारांच्या मदतीला पुढे सरसावले आहेत. सलमान खानचे नाव यात आघाडीवर आहे. आता सलमानच्या ‘बीइंग ह्युमन’ या एनजीओने फिल्म इंडस्ट्रीत काम करणा-या 25 हजार लोकांना आर्थिक मदत देऊ केली आहे. विशेष म्हणजे, गरजूंच्या खात्यात पैसे जमा करण्याचे कामही सुरु झाले आहे.
चित्रपट व टीव्ही इंडस्ट्रीचे असिस्टंट डायरेक्टर मनोज शर्मा यांनी या मदतीचा स्क्रिनशॉट शेअर केला. सलमानने खात्यात पैसे जमा करताच बँकेकडून मॅसेज आला. मनोज यांनी बँकेच्या या मॅसेजचा स्क्रिनशॉट शेअर केला. सोबत सलमानचे आभारही मानलेत. ‘सलमान सर, दुर्दैवाने मला अद्याप तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली नाही. ना मी तुमच्या टीमचा सदस्य आहे. पण असे असतानाही इंडस्ट्रीतील माझ्यासारख्या हजारो अनोळखी लोकांची तुम्ही मदत करत आहात. आम्ही तुमचे किती आभारी आहोत, हे शब्दांत सांगू इच्छित नाही,’असे मनोज यांनी लिहिले आहे.
सलमानशिवाय बॉलिवूडचे अनेक दिग्गज अभिनेत्यांनीही या संकटात मदतीचा हात पुढे केला आहे. अक्षय कुमार, शाहरूख खान अशा अनेकांची नावे या यादीत आहेत. पीएम केअर्स फंडात 25 कोटी दिल्यानंतर अक्षयच्या मदतीचा ओघ अद्यापही सुरु आहे. अलीकडे त्याने मुंबई पोलिस फाऊंडेशनला 2 कोटींची मदत केली. त्याआधी बीएमसीला 3 कोटींची मदत दिली. शाहरूखनेही पीएम फंडात मदत देण्यासोबत आरोग्य कर्मचा-यांच्या सुरक्षेसाठी 25 हजार पीपीई किट्स दिल्यात. शिवाय हजारो लोकांना भोजन पुरवण्याचे कामही तो करतोय.