अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सुशांतच्या मृत्यूसाठी बॉलिवूडमधील घराणेशाहीच जबाबदार आहे, असे जाहीर आरोप खुद्द इंडस्ट्रीत अनेक वर्षांपासून वावरणा-या कलाकारांकडून होत आहेत. अशात सलमान खान, करण जोहर, आलिया भट असे काही कलाकार सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहेत. अनेकांनी या कलाकारांवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. अभिनेता सलमान खान याला देखील ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. आत्तापर्यंत सलमानने यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता मौन सोडत ट्विटरवर त्याने त्याच्या चाहत्यांना एक आवाहन केले आहे. या कठीण प्रसंगात सुशांतच्या कुटुंबीयांना आणि त्याच्या चाहत्यांना साथ द्या, असे त्याने म्हटले आहे.
‘माझ्या चाहत्यांनी माझी अशी विनंती आहे की सुशांतच्या चाहत्यांबरोबर उभे राहा़ सुशांतच्या चाहत्यांच्या भाषेकडे लक्ष न देता त्यामागील भावना समजून घ्या. कृपया त्याच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना साथ द्या कारण आपल्या माणसांचे जाणे अत्यंत वेदनादायी असते,’असे सलमानने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.विशेष म्हणजे, त्याच्या या ट्विटनंतर त्याला आणखी ट्रोल केले जात आहे. अर्थात काहींनी त्याचे कौतुकही केले आहे.
अॅक्टिंग चांगली करतोय, आता हे ढोंग सोड, असे काहींनी त्याला सुनावले आहे. तर काहींनी ‘आपका हुकुम सर आंखों पर भाई,’ असे लिहित सलमानचे समर्थन केले आहे.
सुशांतच्या आत्महत्येनंतर सर्वप्रथम दिग्दर्शक अभिनव कश्यपने सलमानवर आरोप केले होते. सलमान व त्याच्या कुटुंबाने माझ्या करिअरची वाट लावली, असा आरोप त्याने केला होता. गायक सोनू निगम याने सुद्धा नाव न घेता सलमानवर निशाणा साधला होता.