सलमान खानच्या आगामी 'सिकंदर' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. 'टायगर ३' सिनेमानंतर सलमानची प्रमुख भूमिका असलेला 'सिकंदर' सिनेमाच्या घोषणेपासूनच सर्वांना सिनेमाची उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी 'सिकंदर'च्या सेटवरुन सलमान खानचा फोटोही व्हायरल झाला होता. अशातच 'सिकंदर' सिनेमाबद्दल फार मोठी अपडेट समोर येतेय. ती म्हणजे भाईजानच्या आगामी सिनेमात अभिनेत्याच्या चाहत्यांना खास सरप्राइज मिळणार आहे. काय आहे ती गोष्ट? जाणून घ्या.
सलमानच्या 'सिकंदर'मध्ये असणार ही खास गोष्ट
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार 'सिकंदर'चे निर्माते साजिद नाडियाडवाला आणि दिग्दर्शक ए.आर.मुरुगुदास यांनी एक महत्वाची योजना बनवली आहे. 'सिकंदर' सिनेमाचे दिग्दर्शक प्रीतम यांनी सिनेमासाठी होळी आणि ईद सणांचा विचार करुन खास दोन गाणी तयार केली आहेत. होळी आणि ईद या दोन्ही सणांसाठी सिनेमात वेगवेगळी गाणी असणार आहेत. सलमान खान आणि रश्मिका मंदाना लवकरच या दोन्ही गाण्यांच्या शूटिंगला सुरुवात करतील. रिपोर्टसनुसार ईदमध्ये कव्वाली गाण्याचा समावेश तर होळीमध्ये खास प्रेमगीत असणार आहे. संगीतकार प्रीतम या दोन्ही गाण्यांच्या संगीताची धुरा सांभाळणार आहे.
'सिकंदर' सिनेमाविषयी कधी होणार रिलीज?
'सिकंदर' सिनेमाबद्दल सांगायचं तर या सिनेमात सलमान खान प्रमुख भूमिकेत आहे. शिवाय सलमानसोबत अभिनेता शरमन जोशी, सत्यराज, रश्मिका मंदाना, काजल अग्रवाल, सुनील शेट्टी या कलाकारांचीही सिनेमात भूमिका असणार आहे. पुढील वर्षी २०२५ च्या ईदमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. २०२३ मध्ये रिलीज झालेल्या 'टायगर ३' सिनेमानंतर सलमान खान नुकताच 'सिंघम अगेन'मध्ये कॅमिओ करताना दिसला. याशिवाय सलमान वरुण धवनच्या आगामी 'बेबी जॉन' सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका करणार आहे. अशाप्रकारे काही सिनेमांमध्ये कॅमिओ केल्यानंतर सलमान 'सिकंदर'मध्ये खूप महिन्यांनी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.