अभिनेता सलमान खानने (Salman Khan) त्याच्या 'अंतिम : द फायनल ट्रुथ' (Antim: The Final Truth) या चित्रपटाच्या प्रमोशनानिमित्त गुजरातमधील साबरमती आश्रमाला (Sabarmati Ashram) भेट दिली. यावेळी सलमानने चक्क आश्रमचालकाच्या मदतीने चक्क बापूंचा चरखाही चालवून आश्रमाच्या व्हिजिटर बुकमध्ये आपले मत व्यक्त केले आहे. या भेटीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले असून ही गांधीगिरी सलमानच्या चाहत्यांना चांगलीच भावली आहे.
सलमान खान आज महात्मा गांधी यांच्या ऐतिहासिक साबरमती आश्रमात पोहचला. तिथे सलमानचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी सलमानने हिरव्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स परिधान केली होती. सलमान जवळपास दहा ते पंधरा मिनिटे आश्रमात होता. यादरम्यान त्याने चरखाही चालवला. तसेच, आश्रमाला भेट देऊन निघताना सलमानने व्हिजिटर बुकमध्ये आपला अभिप्राय लिहिला. त्याने लिहिले की, 'मला इथे यायला खूप आवडले आणि हा आनंद मी कधीच विसरणार नाही. मला पहिल्यांदाच अशा ठिकाणी फिरायला मिळाले आहे. मला या आश्रमात पुन्हा यायला आवडेल.'
दरम्यान, आश्रमाच्या व्हरांड्यात बसून त्याने चरख्यावर हात फिरवण्याचा प्रयत्न केला. हा तोच चरखा आहे ज्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक राष्ट्रप्रमुखांनी सूत कातले आहे. आश्रमाने त्यांच्या परंपरेनुसार सलमानचे स्वागत करताना कापसाचा हार घालण्यात आला. सलमानने देखील त्यांच्या खास शैलीत तो हार हाताला गुंडाळला होता. तसेच, साबरमती आश्रमात पोहोचल्यावर सलमानने निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याशी गांधीजींबद्दलच्या सिद्धांतांवर चर्चा केली.
'अंतिम : द फायनल ट्रुथ' 'अंतिम : द फायनल ट्रुथ' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडकला आहे. या चित्रपटासाठी सलमान खान आणि आयुष शर्मा यांना समीक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. या चित्रपटात सलमान खानचा नवा अवतार पाहायला मिळत आहे. सलमान खान आणि आयुष शर्माची अॅक्शन जोडी प्रेक्षकांना खूप आवडली असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 4.5 कोटींची कमाई केली होती. आता वीकेंडच्या अखेरीस या चित्रपटाने जवळपास 18 कोटींचा व्यवसाय केला आहे.