सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या अफेअरची एकेकाळी चांगलीच चर्चा झाली होती. ते दोघे अनेक सार्वजिनक ठिकाणी एकत्र हजेरी लावत असत. ते दोघे लग्न करणार असे वाटत असतानाच त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. हम दिल दे चुके या चित्रपटातील त्या दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडली होती. या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाले असले समीर-नंदिनी ही पात्रं आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत.
सलमान खान आणि ऐश्वर्या रायच्या जोडीचा त्यावेळी बोलबाला असल्याने त्या दोघांना अनेक चित्रपटात नायक-नायिकेच्या भूमिकेसाठी विचारले जात असे. पण तुम्हाला माहीत आहे का, एका चित्रपटात सलमानला चक्क ऐश्वर्याच्या भावाच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते. पण ऐश्वर्याच्या भावाची भूमिका साकारणे त्याला पटत नसल्याने त्याने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता.
शाहरुख खान आणि ऐश्वर्या रायचा जोश हा चित्रपट तुम्हाला आठवतोय का? हम भी है जोश में बाते कर होश में हे... हे गाणे आजही अनेकांच्या ओठावर रुळलेले आहे. याच चित्रपटात शाहरुख आणि ऐश्वर्या हे भाऊ-बहिणीच्या भूमिकेत होते. याच चित्रपटात शाहरुखच्या भूमिकेसाठी सलमानला विचारण्यात आले होते. या चित्रपटासाठी सलमानने नकार दिल्याने या चित्रपटात शाहरुखची वर्णी लागली.
जोश या चित्रपटाचे दिग्दर्शन मन्सूर खानने केले होते तर या चित्रपटाची निर्मिती गणेश जैन आणि रतन जैन यांची होती. या चित्रपटात शाहरुख आणि ऐश्वर्यासोबत चंद्रचुड सिंग, शरद कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटातील अपुन बोला तू मेरी..., हम तो दिल से हारे..., अशी अनेक गाणी चांगलीच गाजली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. हा चित्रपट भारतातच नव्हे तर जगभरात गाजला होता. या चित्रपटासाठी सलमानने होकार दिला असता तर आपल्याला मॅक्सच्या भूमिकेत सलमानला पाहायला मिळाले असते.