Salman Khan Eid Party : सलमान खान (Salman Khan) दरवर्षी ईदची पार्टी देतो. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी त्याच्या या पार्टीला हजेरी लावतात. पण यंदा सलमानच्या गॅलॅक्सी अपार्टमेंटमध्ये ईदची पार्टी होणार नाहीये. रिपोर्टनुसार, यावर्षी प्लान थोडा बदलला गेला आहे. यंदा ईदची पार्टी गॅलॅक्सीऐवजी सलमानची बहिण अर्पिता खानच्या घरी होणार आहे.
दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर सलमानचा सिनेमा रिलीज होतो. यंदा यात खंड पडला आहे. पण पार्टी मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रँड असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण खान कुटुंबीयांनी यंदाची ईद अर्पिताच्या घरी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक स्टार्स या पार्टीला हजेरी लावतील. संपूर्ण खान कुटुंबीयांसह सलमानचे जवळचे मित्र या पार्टीला हजर असतील. अर्पिता आणि तिचा पती आयुष शर्मा यांनी सर्व पाहुण्यांना निमंत्रण दिलं आहे. त्यांच्या खार येथील लक्झरी अपार्टमेंट पार्टी होईल. अर्पिता व आयुषने या वर्षाच्या सुरूवातीला फ्लाइंग कार्पेट बिल्डींगमध्ये एक अलिशान घर खरेदी केलं होतं.
सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, भाईजान सध्या ‘टायगर 3’ च्या शूटींगमध्ये बिझी आहे. यात तो कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांच्यासोबत दिसणार आहे. याशिवाय सलमान खान आणि साजिद नाडियाडवाला यांचा आगामी चित्रपट ‘कभी ईद कभी दिवाली’ हा भाईजानचा चित्रपट देखील येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आयुष शर्मा आणि शहनाझ गिल यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.