Join us

सलमान खानच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तिचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 10:25 AM

सलमानने खुद्द सोशल मीडयावर दिली माहिती

ठळक मुद्देअब्दुल्लाचा मृत्यूनंतर कोरोनाच्या शंकेमुळे पोलिस-प्रशासन अधिकारी सक्रीय झाले आहे.

अख्ख्या देशात कोरोनाने हैदोस घातला आहे. देशातही कोरोनाचा प्रकोप वाढत असताना सगळीकडे दहशतीचे वातावरण आहे. अशात बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याच्या पुतण्याचे निधन झाले आहे. सलमानचा 38 वर्षीय पुतण्या अब्दुल्ला खान उर्फ आबा याचे सोमवारी निधन झाले. सलमानने खुद्द सोशल मीडयावर याची माहिती दिली आहे.

 अब्दुल्ला हा सलमानच्या चुलतभावाचा मुलगा होता. अब्दुल्ला खान मुंबईच्या कोकिळाबेन रूग्णालयात भरती होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या फुफ्फुसात संसर्ग झाला होता. त्याला हृदय आणि मधूमेहाचाही त्रास होता. दोन दिवसांपूर्वी त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी ऐकताच सलमान व त्याच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली.

सलमानने त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर करत माहिती दिली आहे. फोटोत सलमान व अब्दुल्ला एकत्र दिसत आहेत. ‘तुझी सतत आठवण येईल,’ असे सलमानने लिहिले आहे. यावरून अब्दुल्ला सलमानच्या किती जवळ होता, हे लक्षात येते.

 अब्दुल्ला एक बॉडी बिल्डर होता. सलमान व अब्दुल्ला या दोघांनी बॉडी बिल्डिंगचे ट्रेनिंग एकत्र घेतले होते. काही काळापूर्वी अब्दुल्लाने जिम उपकरणांचा ब्रँड सुरू केला. सलमानच्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी तो महेश्वरलाही गेला होता. सलमान खान आणि तो दुचाकीवर फिरतानाचा फोटो तेव्हा समोर आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी अब्दुल्लाचा अपघात झाला होता. त्याला अनेक औषध खावी लागत होती. पण 23 मार्चला त्याने औषध घेतले नाही. म्हणून काम करताना छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या यानंतर त्याला रूग्णालयात भरती करण्यात आले.

कोरोनाची शंका?

दरम्यान अब्दुल्लाचा मृत्यूनंतर कोरोनाच्या शंकेमुळे पोलिस-प्रशासन अधिकारी सक्रीय झाले आहे. सलमान खानचा चुलत भाऊ मतीन खान याने सांगितले की, अब्दुल्लाला हृदय व मधूमेहाचाचा आजार होता. तो बॉडीबिल्डर आणि जास्त वजनदार होता. त्याचे हृदय 30 टक्क्यांपेक्षा कमी काम करत होते. मतीन म्हणाला की, मृत्यूनंतर कोरोनाच्या शंकेमुळे पोलिस-प्रशासनाच्या अधिका-यांचे कॉल सुरू झाले.तपासणी अहवाल रुग्णालयातून येईल, तेव्हाच मृत्यूचे खरे कारण समोर येईल.

टॅग्स :सलमान खान