Join us  

सलमान-शाहरूखचा अवतार बघून घाबरली सोनम कपूरची मॉम; म्हटले; ‘यांना कंट्रोल करा’!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2018 9:27 AM

सोनम कपूरच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीचे अनेक व्हिडीओ समोर आले असून, त्यामध्ये शाहरूख-सलमानची धमाल मस्ती बघावयास मिळत आहे.

अभिनेत्री सोनम कपूरने दिल्लीस्थित बिझनेसमॅन आणि बॉयफ्रेंड आनंद आहुजाबरोबर अतिशय धूमधडाक्यात लग्न केले. पंजाबी रीतिरिवाजाने पार पडलेल्या या लग्नाचे ग्रॅण्ड रिसेप्शनही देण्यात आले होते. रिसेप्शनमध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी सहभाग घेतला होता. मात्र बॉलिवूडच्या दोन सुपरस्टार्सनी या रिसेप्शन सोहळ्यात वेगळीच रंगत आणली होती. होय, सुपरस्टार शाहरूख खान आणि सलमान खानने रिसेप्शन पार्टीत असा काही जल्लोष केला की, बघणारे सगळेच दंग झाले. सध्या या पार्टीतील बरेचसे व्हिडीओ समोर आले असून, त्यामध्ये सलमान आणि शाहरूख मस्तीच्या मूडमध्ये गाताना अन् नाचताना दिसत आहेत. एका खास व्हिडीओमध्ये तर शाहरूख आणि सलमान चक्क अनिल कपूरची पत्नी सुनीता कपूरसाठी गाणं गाताना दिसत आहेत.  शाहरूख-सलमान या पार्टीत त्यांच्या करण-अर्जुन या चित्रपटातील गाणं गाऊन त्याकाळातील आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. सुनीतासाठी गुडघ्यावर बसून हे दोघेही गाणं गाताना दिसत आहेत. दोघे केवळ सुनीतासाठी ‘ये बंधन तो...’ हे गाणं गात आहेत. शाहरूख-सलमानचा हा अंदाज बघून उपस्थित सर्वच दंग झाल्याचेही दिसून येत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या चेहºयावरील हसूही कमी होताना दिसत नाही. अशात सुनीता तिच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांना ‘कंट्रोल देम’ असे म्हणताना दिसत आहे. त्याचबरोबर व्हिडीओमध्ये रणवीर सिंग आणि अनिल कपूरही दिसत असून, त्यांना हसू आवरणे मुश्कील होत आहे. बराच काळ या दोघांचा ड्रामा बघून अखेर सोनम पुढे येऊन मम्मी सुनीताला धीर देताना दिसून येते.  या पार्टीदरम्यान, शाहरूख आणि सलमानने मीका सिंगच्याही गाण्यावर चांगलाच ताल धरल्याचे दिसते. अनिल कपूर, वरुण धवन हेदेखील त्यांच्या रंगात नाचताना दिसतात. दरम्यान, सोनम-आनंदच्या या रिसेप्शन पार्टीत इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज सहभागी झाले होते. शाहरूख पत्नी गौरीसोबत पार्टीत हजर होता. तर सलमान बहीण अर्पिता खान आणि मेहुणा आयूष शर्मा याच्यासोबत बघावयास मिळाला.