बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडमधील दोन बहुचर्चित सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. बहुप्रतीक्षित असलेला विकी कौशलचा 'सॅम बहादूर' आणि रणबीर कपूरचा 'ॲनिमल' आज अखेर प्रदर्शित झाला आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर काटें की टक्कर पाहायला मिळणार आहे. पण, प्रदर्शित होताच हे दोन्ही चित्रपट ऑनलाइन लीक झाले आहेत. त्यामुळे विकी कौशल आणि रणबीर कपूरला मोठा धक्का बसला आहे.
रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेला 'ॲनिमल'चा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची या सिनेमाबाबत उत्सुकता वाढली होती. 'ॲनिमल'मधील रणबीरच्या लूकची सर्वत्र चर्चा रंगली होती. तर विकी कौशलच्या 'सॅम बहादूर'चा ट्रेलर पाहून चाहते थक्क झाले होते. ट्रेलरमध्येच विकीच्या दमदार अभिनयाची झलक पाहायला मिळाली होती. त्यामुळे 'सॅम बहादूर'च्या प्रतीक्षेत प्रेक्षक होते. या चित्रपटांच्या ॲडव्हान्स बुकिंगलाही मोठा प्रतिसाद मिळाला होता. पण, प्रदर्शनाच्या दिवशीच सॅम बहादूर आणि 'ॲनिमल' ऑनलाइन लीक झाला आहे.
'ॲनिमल' आणि 'सॅम बहादूर' या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर तगडी टक्कर होणार आहे. अशातच हे दोन्ही सिनेमे ऑनलाइन लीक झाल्याने विकी आणि रणबीरचं टेन्शन वाढलं आहे. टेलिग्राम, तमिळ रॉकर्स अशा साईट्सवर हे सिनेमे लीक झाले आहेत. चित्रपट ऑनलाइन लीक झाल्यामुळे त्याचा बॉक्स ऑफिसवरील कमाईवरील परिणाम होईल का? अशी चिंता त्यांना सतावत आहे.
दरम्यान, 'सॅम बहादूर'मध्ये विकी कौशलसह सान्या मल्होत्रा आणि फातिमा शेख यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमधून ८ कोटींची कमाई केली होती. तर रणबीरचा 'ॲनिमल' याबाबतीत वरचढ आहे. ॲडव्हान्स बुकिंगमधून 'ॲनिमल' सिनेमाने २० कोटींची कमाई केली होती. त्यामुळे बॉक्स ऑफिसच्या शर्यतीत सॅम बहादूरला मागे टाकत 'ॲनिमल' बाजी मारेल का? हे पाहावं लागेल.