साऊथमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री समंथा प्रभू (Samantha Ruth Prabhu) सध्या 'सिटाडेल' मुळे चर्चेत आहे. आता नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, समंथा अभिनयातून काही काळासाठी ब्रेक घेत आहे. निर्मात्याचे पैसेही तिने परत केले असल्याची चर्चा आहे.
आधी घटस्फोट आणि त्यानंतर आजारपणामुळे समंथा काही काळापासून त्रस्त आहे. मायोसायटिस या गंभीर आजाराचा ती सामना करत आहे. अशातच आता तब्येतीकडे लक्ष द्यायचं या कारणाने ती काही काळ कामातून ब्रेक घेत आहे. किमान एक वर्ष तरी समंथा मोठ्या पडद्यावर दिसणार नाही. माध्यम रिपोर्ट्सनुसार, हातात असलेले प्रोजेक्टही तिने सोडले असून निर्मात्याला पैसेही परत दिले आहेत. समंथाच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, 'समंथा कामातून एक वर्षाचा मोठा ब्रेक घेत आहे आणि कोणतीही नवी तेलुगू किंवा बॉलिवूड फिल्म साईन करणार नाही. या वेळेचा उपयोग ती आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी आणि उपचारासाठी करणार आहे. समंथाने निर्मात्यांनी दिलेलं आगाऊ पेमेंटही परत दिलं आहे.'
2022 वर्षाच्या अखेरीस समंथाने पोस्ट शेअर करत तिच्या आजारपणाविषयी माहिती दिली होती. मायोसायटिस नावाच्या ऑटोइम्यून आजाराने ती त्रस्त आहे. तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरु आहेत. नुकतेंच सिटाडेल सिनेमाच्या शूटिंगवेळी आजारपणाला एक वर्ष पूर्ण झाल्याचं सांगत सेंट सावा चर्चला भेट दिली होती. इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट शेअर करत तिने याची माहिती दिली होती.
समंथा रुथ प्रभू 'शाकुंतलम' सिनेमातही दिसली. तर लवकरच तिची 'सिटाडेल' ही सिरीज रिलीज होणार आहे. यामध्ये तिच्यासोबत वरुण धवनची मुख्य भूमिका आहे. तर तिचा आणि विजय देवरकोंडाचा 'खुशी' सिनेमाही प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. समंथाचं वैयक्तिक आयुष्यही मध्यंतरी चर्चेत होतं. आधी अभिनेता नागा चैतन्यसोबत लग्न आणि काही वर्षातच घटस्फोटामुळे दोघंही चर्चेत आले होते.