कॉर्डिलिया क्रूझवर सापडलेल्या अमली पदार्थ प्रकरणात अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला अटक न करण्यासाठी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा ठपका ठेवत सीबीआयने एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यासह अन्य दोन अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आर्यन खान ड्रग्स प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय. दरम्यान समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ होत असतानाच आता शाहरुखचं एक ट्वीट व्हायरल होतंय.
आर्यन खानची मुक्तता करण्यासाठी वानखेडेंनी शाहरुख खानकडे २५ कोटी रुपये मागितले होते, शेवटी १८ कोटींना डील पक्की झाली होती, असं सीबीआयनं आपल्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे. मुलाला अशा पद्धतीने अटक झाल्याविरोधात शाहरुख आजपर्यंत कुठेच काहीच बोलला नव्हता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला होता. तेव्हाचं त्याचं एक ट्वीट आता व्हायरल होतंय. यात त्याने लिहिलं, "एक नवीन रेस्टॉरंट आहे ज्याचं नाव कर्मा असं आहे. तिथे कोणताही मेन्यू नाही. तुम्ही जे केलंत तेच तुम्हाला मिळेल."
समीर वानखेडेंवर कधीही कारवाई होऊ शकते. तर त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर मात्र ठामपणे उभी आहे.समीर वानखेडे यांच्यावर होत असलेले आरोप चुकीचे आहेत, हे सर्वांना माहीत आहे. हे केवळ आरोप आहेत आणि आम्ही सीबीआयच्या कारवाईत पूर्ण सहकार्य करत आहोत, असं पत्नी क्रांती रेडकर यांनी सांगितलं. कायदा आणि सुव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि आम्ही एक जबाबदार नागरिक म्हणून तपास यंत्रणेला सहकार्य करण्यास तयार आहोत, असंही क्रांती रेडकरने यावेळी सांगितले.
२८ दिवस आर्यन खान होता तुरुंगात
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझवर 2 ऑक्टोबर 2021 रोजी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीने छापा टाकला होता. दरम्यान आर्यन खानसह 8 जणांना अटक करण्यात आली. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी त्या लोकांवर NDPS कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणात आर्यन खानला 28 दिवस तुरुंगात राहावे लागले. 27 मे 2022 रोजी एनसीबीने आरोपपत्रातून आर्यन खानचे नाव काढून टाकले तर दुसरीकडे समीर वानखेडे यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमधून बदली करण्यात आली.