शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) 'जवान'चा (Jawan) ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरमधील एका डायलॉगमुळे चाहत्यांना समीर वानखेडेंचीच (Sameer Wankhede) आठवण झाली. 'बेटे को हात लगाने से पहले बाप से बाप कर' असा तो डायलॉग आहे. नेटकऱ्यांनी डायलॉगचं कनेक्शन थेट समीर वानखेडेंशी लावलं. याचं कारण म्हणजे आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरुख आणि समीर वानखेडे यांच्यात झालेला वाद.
कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्स केसप्रकरणी शाहरुखचा मुलगा आर्यन खानला तत्कालीन एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंनी ताब्यात घेतलं. नंतर त्याला २ महिने तुरुंगातही राहावं लागलं. दरम्यान शाहरुख खूप अस्वस्थ झाला होता. दोन महिन्यांनंतर आर्यन खानची सुटका झाली. तर काही दिवसांपूर्वीच समीर वानखेडेंवर खंडणी मागितल्याचा आरोप झाला. हे प्रकरण अजूनही कोर्टात सुरु आहे. शाहरुखने मात्र त्याच्या स्टाईलमध्ये आगामी सिनेमाच्या डायलॉगमधून जबरदस्त डायलॉग मारला आहे. तर दुसरीकडे समीर वानखेडेंचं ट्वीट चर्चेत आलं आहे.
समीर वानखेडेंचं ट्वीट काय आहे?
समीर वानखेडेंनी निकोल लिओन्स यांचा कोट शेअर केला आहे. ते म्हणतात,'मी आगीसोबत खेळलो आहे आणि आगीत खाक झालेल्या त्या प्रत्येक पुलावर नाचलो आहे. मला नरकाची भीती नाही.' हे कोट मला नेहमीच प्रेरणा देतं असंही त्यांनी म्हटलं आहे.
शाहरुख आणि समीर वानखेडे यांच्यातील वाद अजूनही संपलेला नाही. लाडक्या लेकाला अडकवल्याप्रकरणी शाहरुख खानच्या मनात समीर वानखेडेंबद्दल राग आहेच. आर्यन तुरुंगात असताना शाहरुखने वानखेडेंकडे अनेक प्रकारे विनवणी केली होती. त्यांचं चॅट काही दिवसांपूर्वी व्हायरल झालं होतं. आता जवानमधून शाहरुख आणखीही काही इशारा देतो का हे सिनेमा बघूनच कळेल. ७ सप्टेंबरला 'जवान' प्रदर्शित होणार आहे.