समेक्षा सिंहने गेल्या 15 वर्षांत तमिल, तेलुगु, कन्नड़, पंजाबी, हिंदी अशा विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने खिचडी, पोरस, बडी दूर रे आये है, यहाँ में घर घर खेली यांसारख्या अनेक मालिकांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. समेक्षाच्या आजवरच्या अनेक भूमिकांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. समेक्षाने नुकतीच नवभारत टाईम्स ऑनलाईनला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने इंडस्ट्रीविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
समेक्षाने विविध भाषेतील इंडस्ट्रीत काम केले आहे. ती तिच्या अनुभवाविषयी या मुलाखतीत सांगते की, प्रत्येक इंडस्ट्रीत वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटत असतात. सगळ्याच इंडस्ट्रीत वाईट नजरेने पाहाणारे अनेक लोक असतात. त्यामुळे एखादी इंडस्ट्री चांगली, एखादी वाईट असे मी सांगू शकत नाही. पण मी दाक्षिणात्य इंडस्ट्रीत काम करण्याचे बंद का केले यामागे एक खास कारण आहे. तिथले वातावरण खूपच वेगळे असते. या इंडस्ट्रीत नक्कीच काही चांगले लोक आहेत. पण तिथे काही वाईट लोक देखील आहेत... जे तुमच्याकडे अतिशय वाईट नजरेने पाहातात. कोणीही कोणतीही गोष्ट तुम्हाला प्रत्यक्षपणे सांगत नाहीत. पण त्यांच्या वागण्यातून-बोलण्यातून त्यांच्या मनात काय सुरू आहे हे तुम्हाला कळते. ते तुमच्यावर बळजबरी करतात असे देखील नाही. पण अशा वृत्तीच्या माणसांसोबत काम करूच नये असे आपल्याला वाटते. त्याचमुळे मी दाक्षिणात्य इंडस्ट्रीत काम करायला नकार द्यायला सुरुवात केली.
याविषयी पुढे समेक्षा सांगते, मी अभिनयक्षेत्रात येण्याआधी खूप चांगले शिक्षण घेतले आहे. त्यामुळे मी इंडस्ट्री सोडली तर मला कधीही चांगली नोकरी मिळू शकते. पण काही मुली खूपच कमी वयात या क्षेत्रात येतात. मग इंडस्ट्रीत आल्यानंतर आता मी घरी परत कशी जाऊ असा प्रश्न त्याला पडलेला असतो. याचात फायदा अनेकजण घेतात. एका चित्रपटात मी काम करत असताना मला रोमँटिक सीन करायला जमत नव्हता. त्यावर दिग्दर्शक मला म्हणाला, तू खूपच अनकर्म्फटेबल वाटत आहेस... मी तुला हे दृश्य समजावतो आणि समजवण्याच्या बहाण्याने त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. काही वेळा तर रोमँटिक सीन चांगला झाला तरी केवळ मजा घेण्यासाठी तो पुन्हा पुन्हा करायला लावला जात असे.
समेक्षा तिच्या एका लूक टेस्टच्या अनुभवाविषयी सांगते, माझा पहिला चित्रपट हिट झाला होता. त्यानंतर मला एका खूप मोठ्या दिग्दर्शकाने भेटायला बोलावले. लूक टेस्टसाठी काही कपडे घालायला दिले. पहिला लूक हा भारतीय पेहरावातील होता. पण तो झाल्यानंतर मला बिकनी घालायला सांगितली. इतक्या लोकांच्या समोर मी बिकनी घालणार नाही असे मी त्यांना लगेचच सांगितले. त्यावर या चित्रपटात एक बीचवर गाणे आहे. त्यासाठी ही लूक टेस्ट असल्याचे त्यांनी मला सांगितले. त्यावर मी बिकनीतील फोटो पाठवते, त्यावर तुम्ही ठरवा असे मी त्यांना सांगितले. पण त्यावर ते तयारच नव्हते. याच कारणामुळे तो चित्रपट करायचा नाही असे मी ठरवले. कॉम्प्रोमाझज करणे ही सामान्य गोष्ट आहे असे अनेकवेळा सगळ्याच इंडस्ट्रीत येणाऱ्या नवोदित कलाकारांना सांगितले जाते. पण मी एकच सांगेन, तुम्ही मेहनत घेतली तर तुम्हाला नक्कीच यश मिळते. त्यामुळे घाबरून जाऊ नका. इंडस्ट्रीत चांगले लोक देखील आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याची नक्कीच संधी कधी ना कधी मिळेल.