टेनिसपटू सानिया मिर्झा सध्या प्रेग्नंट आहे. काल परवा ती भारतात आली. यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे तेज आणि आनंद सगळ्यांनीच हेरला. भारतात आल्यानंतर सानियाने मुंबईत आयोजित एका इव्हेंटला हजेरी लावली. केवळ हजेरीचं नाही तर तिने या इव्हेंटच्या मंचावरून आपल्या चाहत्यांना एक खास प्रार्थनाही केली. होय, मी प्रेग्नंट आहे़ सगळे लोक माझ्या पोटी मुलगा यावा, अशी प्रार्थना करताहेत. पण तुम्ही माझे खरे शुभचिंतक असाल तर मला मुलगा नाही तर मुलगी व्हावी, अशी प्रार्थना करा, असे सानिया म्हणाली.
यामागचे कारणही तिने सांगितले. ती म्हणाली की, ‘मला भाऊ नाही. आम्ही दोघी बहिणीचं. मी सहा वर्षांची असतानापासून टेनिस खेळू लागले. मला टेनिस खेळताना पाहून माझ्या घरी येणारे जाणारे सगळेच मला एक सल्ला न चुकता द्यायचे. शॉर्ट स्कर्ट घालून उन्हातान्हात खेळशील तर काळी पडशील, असे ते मला सांगायचे. तुम्हाला भाऊ नाही का, असाही त्यांचा प्रश्न असायचा. आम्ही यावर नाही, म्हटले की, ते हळहळ व्यक्त करायचे. खरे तर आम्हाला कधीच भावाची उणीव भासली नाही. आता मी प्रेग्नंट आहे म्हटल्यावर सगळे मला मुलगा व्हावा, असा आशीर्वाद देतात. मी त्यांना मध्येच थांबवते. प्लीज, मला आशीर्वाद द्यायचा तर मुलगी होईल, असा द्या, असे मी त्यांना म्हणते. आपल्या समाजाची एक मानसिकता बनली आहे. आपल्याला ही मानसिकता बदलायची आहे.’गुडघ्याच्या दुखापतीमुळे गतवर्षी आक्टोबरपासून कोर्टवर न उतरलेल्या सानियाने गत एप्रिलमध्ये ती गर्भवती असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.२०१० मध्ये सानियो पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत लग्न केले होते. लग्नाच्या आठ वर्षांनंतर सानिया व शोएबचे हे पहिले अपत्य असणार आहे.