Join us

शेर है तू शेर...! संजय दत्तसाठी जिगरी दोस्त ‘कमली’ची इमोशनल पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 11:10 AM

संजूला कॅन्सर झाल्याचे ऐकून भावूक झाला परेश

ठळक मुद्दे संजय आणि परेशची पहिली भेट ही न्यूयॉर्कमध्ये झाली होती आणि पहिल्याच भेटीत त्यांच्यात घट्ट मैत्री निर्माण झाली.  

अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसांचा कॅन्सर झाल्याचे वृत्त संजूबाबाच्या कुटुंबासोबतच चाहत्यांनाही जोरदार धक्का होता. संजयचा जिगरी यार ‘कमली’ अर्थात परेश गहलानी याला तर अद्यापही संजयला कॅन्सरने गाठले, यावर विश्वास ठेवणे जड जातेय. सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट लिहून त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.‘भावा, आपण खूप सा-या गोष्टी, अडचणी सहन केल्यात आणि आता तुला आणखी एक लढाई लढायची आहे. ही लढाई तुला जिंकायचीच आहे. कारण  तू किती जिगरबाज आहेस, ते आम्हाला ठाऊक आहे. शेर है तू शेर, लव्ह यू,’ असे परेशने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

कॅप्शनमध्ये त्याने लिहिलेय, ‘खरचं विश्वास बसत नाहीये. काहीच दिवसांपूर्वी आयुष्याचा पुढचा टप्पा कसा घालवणार, यावर आपण दोघे बोललो होतो. आपल्याला हिंडता फिरता आले, आयुष्याचे चढऊतार बघता आले आणि एन्जॉय करण्याची संधी मिळाली म्हणून आपण स्वत:ला नशिबवान म्हटले होते. मी आत्ताही तेच म्हणेल. माझा यावर पूर्ण विश्वास आहे की, आपल्यावर परमेश्वराची कृपा आहे आणि आपला पुढचा प्रवासही तितकाच सुंदर आणि आनंददायी असणार आहे. देवाची कृपादृष्टी आपल्यावर आहे भावा.’

संजयच्या आयुष्यात परेशचे स्थान अनन्यसाधारण आहे. ‘संजू’ या सिनेमात ते आपण पाहिले आहेच. ‘संजू’ या संजय दत्तच्या बायोपिकमध्ये त्याचे वडील  सुनील दत्त, पत्नी मान्यता यांच्यासोबत त्याच्या या मित्राची महत्त्वपूर्ण भूमिका होती. या सिनेमात संजूच्या मित्राचे नाव कमली अर्थात कमलेश दाखवण्यात आले होते. मात्र संजयच्या ख-याखु-या आयुष्यात हा कमली दुसरा तिसरा कुणी नसून परेश गहलानी आहे.  चित्रपटातील कमलेश ही व्यक्तिरेखा परेशवरच   बेतलेली होती. अभिनेता विकी कौशलने ही भूमिका साकारली होती.

परेश गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या कुटुंबियांसोबत अमेरिकेत राहात आहे. त्याचे कुटुंब पूर्वी शिकागो मध्ये राहात होते. पण गेल्या अनेक वर्षांपासून ते लॉस एन्जेलिसमध्ये राहात आहेत. संजय आणि परेशची पहिली भेट ही न्यूयॉर्कमध्ये झाली होती आणि पहिल्याच भेटीत त्यांच्यात घट्ट मैत्री निर्माण झाली.  परेश आजवर संजयच्या प्रत्येक संकटात त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला आहे. परेश हा एक मोठा व्यवसायिक असून त्याने त्याच्या मेहनीतवर आज व्यवसाय क्षेत्रात त्याचे प्रस्थ निर्माण केले आहे. संजय दत्तच्या ‘संजू’ या चित्रपटाच्या प्रिमियरसाठी खास अमेरिकेहून परेश मुंबईत आला होता. पण परेश मीडियापासून दूर राहाणेच पसंत करतो.  

टॅग्स :संजय दत्त