‘लव्ह स्टोरी’ या चित्रपटातून डेब्यू करणारा अभिनेता कुमार गौरव एकेकाळी चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जायचा. पण आता या चॉकलेट बॉयला ओळखणेही कठीण झाले आहे. हा चॉकलेट बॉय म्हणजे अभिनेता कुमार गौरव.
1981 मध्ये ब्लॉकबस्टर चित्रपट ‘लव्ह स्टोरी’ या चित्रपटातून कुमार गौरवने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. कुमारचे नशीब की, त्याचा पहिलाच चित्रपट सुपरडुपर हिट झाला. पण यश सगळ्यांनाच पचवता येत नाही, तसेच कुमारलाही ते पचवता आले नाही. त्याच्या डोक्यात हवा गेली आणि तो नकार देत सुटला. त्या काळातील अनेक नव्या अॅक्ट्रेसेसबरोबर काम करायला त्याने नकार दिला. यातलीच एक म्हणजे मंदाकिनी.
दिनेश बन्सल यांनी त्यांच्या ‘शिरीन फरहाद’ चित्रपटासाठी यास्मीन नावाच्या नव्या मुलीला साईन केले होते. या चित्रपटात त्यांना कुमार गौरव हवा होता. पण मी नव्या मुलीसोबत काम करणार नाही, असे सांगून त्याने यास्मीनसोबत काम करण्यास नकार दिला. याचा परिणाम म्हणजे, चित्रपट बंद झाला. यास्मीनही परत गेली. पण पुढे चार वर्षांनंतर हीच यास्मिन मंदाकिनी बनून परतली. यास्मीनने ‘राम तेरी गंगा मैली’साठी आॅडिशन दिले आणि तिची निवड झाली. चित्रपट हिट झाला आणि मंदाकिनी स्टार बनली. याऊलट कुमार गौरव याच्यावर फ्लॉप स्टारचा शिक्का बसला होता. आता कुठलीही मोठी हिरोईन त्याच्यासोबत काम करायला तयार नव्हती. योगायोग असा की, ज्या मंदाकिनीला कुमार गौरवने नकार दिला होता, तिचेच नाव कुमार गौरवने एका निर्मात्याला सुचवले. पण आधी कुमारने मंदाकिणीसोबत काम करण्यास नकार दिला होता. यावेळी मंदाकिनीने त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला.
कुमार गौरव हा सुपरस्टार राजेंद्र कुमार यांचा मुलगा. अन्य वडिलांप्रमाणे राजेंद्र कुमार यांनीही मुलाचे करिअर वाचवण्यासाठी भरपूर प्रयत्न केलेत. माधुरी दीक्षितला घेऊन ‘फूल’ हा चित्रपट त्यांनी काढला. पण तोही सुपरफ्लॉप ठरला. त्यानंतर कुमार गौरवने तेरी कसम, आॅल राऊंडर, जानम, गूंज, सियासत अशा अनेक चित्रपटांत काम केले, पण त्याला यश मिळाले नाही.
पुढे फिल्म इंडस्ट्रीत जम बसणार नाही, हे कुमार गौरवला कळून चुकले आणि त्याने बिझनेस करायचे ठरवले. सध्या तो मालदीवमध्ये ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय करतो. त्याचा कन्सट्रक्शनचाही बिझनेस आहे.
1984 मध्ये कुमार गौरवने सुनील दत्त यांची मुलगी आणि संजय दत्तची बहीण नम्रता दत्त हिच्यासोबत लग्न केले. दोघांनाही साची आणि सिया अशा दोन मुली आहेत.