Join us

संजय दत्तला दिलासा; अजामीनपात्र वॉरंट रद्द!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2017 9:58 AM

अभिनेता संजय दत्त याच्याविरोधात जारी अजामीनपात्र वॉरंट रद्द झाला आहे. आज सोमवारी अभिनेता संजय दत्त सगळी कामे बाजूला सारून ...

अभिनेता संजय दत्त याच्याविरोधात जारी अजामीनपात्र वॉरंट रद्द झाला आहे. आज सोमवारी अभिनेता संजय दत्त सगळी कामे बाजूला सारून अंधेरी येथील महादंडाधिकारी न्यायालयात हजर झाला. यावेळी संजयला मोठा दिलासा देत, न्यायालयाने त्याच्याविरोधातील अजामीनपात्र वॉरंट  रद्द केला. या कारवाईदरम्यान संजय सुमारे ११ मिनिटे न्यायालयात होता. गत १५ तारखेला  न्यायालयाने एका अनेक वर्षे जुन्या प्रकरणात संजयविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता.संजयवर चित्रपट निर्माते शकील नूरानी यांना धमकावल्याचा आरोप आहे.  याच प्रकरणात  सन २०१३ मध्ये अंधेरी येथील महादंडाधिकारी न्यायालयाने संजयविरोधात वॉरंट जारी केले होते. तेव्हापासून हे प्रकरण न्यायालयात होते. या प्रकरणी संजयने न्यायालयापुढे हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.  मात्र याऊपरही तो न्यायालयात हजर झाला नव्हता. त्यामुळे न्यायालयाने त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता.  दरम्यान हे प्रकरण अतिशय जुने आहे. दरम्यानच्या काळात वकीलांसोबत संवाद खुंटल्याने ही परिस्थिती ओढवली. न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो, असे संजयने म्हटले आहे.असे आहे प्रकरणसंजय दत्त आणि नूरानी यांच्यातील हा वाद १५ वर्षांपूर्वीचा आहे. २००२ मध्ये शकील नूरानी हे ‘जान की बाजी’ हा चित्रपट बनवत होते. या चित्रपटासाठी त्यांनी अभिनेता संजय दत्त याला  मानधनापोटी ५० लाख रुपये दिले होते. चित्रपटाचे चित्रीकरणही सुरू झाले होते. पण अचानक संजयने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. संजयने चित्रपट असा अर्ध्यावर सोडल्याने नूरानी यांना सुमारे पाच कोटींचे नुकसान सोसावे लागले होते. यानंतरही शकील यांनी संजय दत्तशी संपर्क साधला होता. याचवेळी संजयने आपल्याला धमकावल्याचा दावा नूरानी यांनी केला आहे. याप्रकरणी नूरानींनी संजयविरोधात तक्रार केली होती.