Join us

Surendra Rajan : ना लग्न केलं, ना राहण्यासाठी घर बांधलं, पण...; मुन्ना भाई MBBSच्या मकसूद भाईंची हृदयस्पर्शी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 6:11 PM

Surendra Rajan : सामान्य दिसणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाची जीवन जगण्याची पद्धत खूप वेगळी आहे. कदाचित ते एकमेव अभिनेते आहेत ज्यांनी कधीही चित्रपट पाहिले नाहीत.

मुन्ना भाई MBBS या चित्रपटामध्ये झाडू मारणारे मकसूद भाई आणि त्यांचा  "बस कर, रुलाएगा क्या?" हा संवाद तुम्हाला नक्कीच आठवत असेल. सुरेंद्र राजन असं या अभिनेत्याचं नाव आहे. ते एक सामान्य अभिनेता वाटतात, पण प्रत्यक्षात ते एक इंटरनॅशनल वाइल्ड लाइफ फोटोग्राफर, स्कल्पचरिस्ट आणि मोठे कलाकार आहेत. सामान्य दिसणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाची जीवन जगण्याची पद्धत खूप वेगळी आहे. कदाचित ते एकमेव अभिनेते आहेत ज्यांनी कधीही चित्रपट पाहिले नाहीत. फक्त त्याचे दोन चित्रपट पाहिले असतील. 

सुरेंद्र राजन हे जगण्यासाठीच चित्रपटात काम करतात, जेणेकरून कमाई केल्यावर जग फिरता येईल. त्यांना हिमालयात राहण्याची आवड आहे आणि ते म्हणतात की, "आयुष्य लहान आहे आणि जग मोठे आहे, म्हणून ते आनंदाने जगा." सुरेंद्र राजन यांचा जन्म 1939 पन्ना जिल्ह्यातील अजयगड येथे झाला. जमीनदार घराण्यातील सुरेंद्र राजन यांच्या कुटुंबाचे तत्कालीन राजा पुण्य प्रताप सिंह यांच्यासोबत चांगले संबंध होते. त्याच्या शिकण्याच्या उत्सुकतेने खूश होऊन राजाने त्यांना आपल्याजवळ ठेवले आणि फोटोग्राफी करताना त्यांना खूप काही शिकवले. 

चित्रकला आणि शिल्पकलेत निपुण 

शाळेतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना रेवाच्या कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. त्यांना चित्रकलेची आवड होती, शेतीचे शिक्षण सोडून त्यांनी वडिलांच्या इच्छेविरुद्ध लखनौ कला महाविद्यालय गाठले. चित्रकला आणि शिल्पकलेत ते इतके निपुण आहेत की ते प्रत्येक प्रोफेसरचे लाडके होते. शिक्षकांच्या सांगण्यावरून ते दिल्लीत आले आणि अनेक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांचा भाग झाले. पण नंतर कला विकण्याच्या प्रथेला कंटाळून एके दिवशी त्यांनी आपले सर्व सामान बांधले आणि देशातील वेगवेगळ्या शहरात जाऊन वेगवेगळ्या नोकऱ्या करायला सुरुवात केली. 

गरिबांमध्ये वाटतात कमाई 

बांधवगडमध्ये वन्यजीव छायाचित्रण करत असताना, एक्टिविस्ट अरुंधती रॉय यांनी त्यांना बीबीसी लंडनसाठी बनवल्या जाणाऱ्या चित्रपटात कास्ट केले. पहिल्याच चित्रपटानंतर त्यांचं खूप कौतुक केलं गेले. वृत्तपत्रात त्यांचे फोटो प्रसिद्ध झाल्यावर त्यांच्या लूकची तुलना महात्मा गांधी यांच्याशी करण्यात आली. वास्तविक जीवनात त्यांनी लग्न केले नाही किंवा राहण्यासाठी घर विकत घेतले नाही. जर त्यांनी चित्रपटातून किंवा इतर कोणत्याही मार्गाने जास्त कमाई केली असेल, तर ते गरिबांमध्ये वाटतात. गरजेपुरताच पैसा स्वत:कडे ठेवतात. झी न्यूज हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"