बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) सध्या ‘केजीएफ 2’ (KGF 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात संजयने साकारलेल्या अधीराच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होतंय. संजय दत्तने आपल्या फिल्मी करिअरमध्ये बहुतांश कलाकारांसोबत काम केलंय. या आपल्या सहकलाकारांबद्दल त्याला काय वाटतं? आपल्या सहकलाकारांचं एका शब्दांत वर्णन करायचं झाल्यास तो कसा करतो? एका ताज्या मुलाखतीत संजूबाबा यावर बोलला.‘बॉलिवूड लाईफ’ला दिलेल्या मुलाखतीत संजूबाबा सलमान खान (Salman Khan), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar), रणबीर कपूर (Ranbir Kapoor) , अजय देवगण अशा अनेकांबद्दल बोलला. सोबत या सर्वांचं त्याने एका शब्दांत वर्णन केलं.
महानायक अमिताभ बच्चन यांचं ‘भगवान’ अर्थात ‘देव’ असं वर्णन त्याने केलं. सर्वाधिक सेक्सी अभिनेत्री म्हणून त्याने कोणाचं नाव घेतलं तर उर्मिला मातोंडकर हिचं. उर्मिलासोबत संजयने ‘दौड’, ‘खूबसूरत’ अशा चित्रपटांत काम केलंय.अजय देवगणला ‘नम्र’, आमिर खानला ‘प्रोफेशनल’, श्रीदेवीला ‘ऐतिहासिक’, सुनील शेट्टी व सलमान खानचा ‘भाई’, दिलीप कुमार यांना ‘एक और भगवान’ अशा उपमा त्याने दिल्या. रणबीर कपूर हा माझ्या मुलासारखा आहे, असं तो म्हणाला.
‘केजीएफ 2’ या चित्रपटानंतर संजय दत्त ‘शमशेरा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहेत. रवीना टंडनसोबत ‘धुडचढी’ या रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपटात तो झळकणार आहे.
2020 मध्ये ‘केजीएफ 2’चं शूटींग सुरू असतानाच संजय दत्तला कॅन्सरचं निदान झालं होतं. यानंतर कॅन्सरच्या उपचारासाठी तो विदेशात गेला होता. या आजारातून बरा झाल्यावर संजयने सर्वात आधी ‘केजीएफ 2’चं शूटिंग सुरू केलं होतं.