संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित ‘संजू’ हा चित्रपट आपण बघितलाच. या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. तितकीच टीकाही सहन करावी लागली. ‘संजू’ हा निव्वळ संजय दत्तच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न आहे, असा आरोप अनेक स्तरातून झाला. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात संजय दत्त दोषी ठरला होता. पण या भूतकाळावर पडदा टाकून फक्त त्याच्या मेकओव्हरची गोष्टचं या सिनेमात दाखवली गेली, असा ठपकाही ठेवण्यात आला. हे आरोप थंड होत नाही तोच दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी संजय दत्तच्या आयुष्यावर दुसरा चित्रपट बनवण्याचे जाहिर केले.
‘संजू’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर संजय दत्तच्या आयुष्यातील अनेक गोष्टी या चित्रपटात दाखवल्या जाणार असल्याचे प्रेक्षकांना वाटले होते. पण या चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यातील अनेक गोष्टी दाखवण्यात आलेल्या नाहीत. याचाचा आधार घेत राम गोपाल वर्मा यांनी संजय दत्तच्या जीवनातील वादग्रस्त पैलूंना हात घालण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे, संजय दत्तमधील खलनायक जगासमोर आणण्यासाठी आपण हा चित्रपट बनवणार असल्याचे राम गोपाल वर्मा यांनी सांगितले आहे. राम गोपाल यांच्या या योजनेवर संजय दत्तने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. पण संजयची बहीण नम्रता हिने मात्र यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे आणि तिची प्रतिक्रिया बघता, राम गोपाल वर्मांचा दुसऱ्या चित्रपटाचा प्लान तिला फारसा रूचलेला नाही, असेच दिसतेय.एकदा चित्रपट बनल्यावर वारंवार एकच गोष्ट प्रेक्षकांसमोर आणणे, हे कितपत योग्य आहे, असा सवाल नम्रताने केला आहे. रामगोपाल वर्मा आम्हाला पुन्हा एकदा तीच वेदना का देऊ इच्छितात, ते मला कळत नाहीये. संजूच्या आयुष्यावर दुसरा चित्रपट का, हेही मला कळत नाहीये. राम गोपाल वर्मा यांना संजूच्या आयुष्यावर दुसरा चित्रपट काढायचा असेल तर त्यापूर्वी त्यांना संजूची परवानगी घ्यावी लागेल. संजूने परवानगी दिली तरचं हा चित्रपट बनू शकतो, असे नम्रताने स्पष्ट केले आहे.नम्रताच्या या स्पष्टोक्तीनंतर संजय दत्त यावर काय बोलतो, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. शिवाय राम गोपाल वर्मा यांची यानंतरची भूमिका जाणणेही तितकेच औत्सुक्याचे ठरणार आहे.