हिंदी सिनेसृष्टीतील दोन सुपरस्टार अभिनेते सलमान खान (Salman Khan) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) लवकरच आगामी सिनेमात एकत्र काम करणार आहेत. दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे. तसंच दोघंही खऱ्या आयुष्यात चांगले मित्र आहेत. सलमान आणि संजय दत्तला एकत्र पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वीच सलमानने मोठ्या भावासोबत काम करणार असल्याचा खुलासा केला. तर आता संजय दत्तने छोट्या भावाचं कौतुक केलं आहे.
संजय दत्तचा 'भूतनी' सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी संजय दत्तला सलमानविषयी आणि सिकंदर सिनेमाविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, "सुपरहिट ट्रेलर आहे. "सलमान माझा छोटा भाऊ आहे आणि मी नेहमीच त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो. देवाने त्याला बरंच काही दिलं आहे आणि त्याचा हा सिनेमाही नक्की सुपरहिट होणार. आम्ही दोघंही लवकरच सोबत येत आहोत. तुम्ही 'साजन' बघितला, 'चल मेरे भाई'ही बघितला, आता आमच्या पुढच्या सिनेमात टशन बघा."
तो पुढे म्हणाला, "हा एक अॅक्शनपट असणार आहे आणि आम्ही यासाठी खूप उत्सुक आहोत. २५ वर्षांनंतर मी माझ्या छोट्या भावासोबत काम करणार आहे." संजूबाबाच्या या उत्तरावरुन अंदाज येतो की त्यांच्या पुढच्या सिनेमात धमाकेदार अॅक्शन पाहायला मिळणार आहे."
संजय दत्तच्या 'भूतनी' सिनेमा मौनी रॉयचीही भूमिका आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. १८ एप्रिल रोजी सिनेमा रिलीज होत आहे. तर सलमानचा 'सिकंदर' आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.