संजय दत्तने गेल्या अनेक वर्षांत बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याने रोमँटिक, अॅक्शन, कॉमेडी अशा सगळ्याच जॉनरच्या चित्रपटात काम केले आहे. संजय हा आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असून त्याने अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. संजयला त्याच्या अभिनयासाठी आजवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. संजयचे प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याचा आगामी प्रोजेक्ट कोणता असणार याची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात असतात.
अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्यानंतर संजू आता मराठी इंडस्ट्रीकडे वळला आहे. संजू मराठीकडे वळला आहे हे वाचल्यानंतर संजू एखाद्या मराठी चित्रपटात काम करतोय असे तुम्हाला वाटले असेल. पण हे चुकीचे आहे. संजू कोणत्याही मराठी चित्रपटात काम करणार नसून तो एका मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे. त्यानेच ट्विटरद्वारे ही गोष्ट त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे.
संजय दत्तने नुकतेच एक ट्वीट करून त्यात लिहिले आहे की, माझ्या पहिल्या मराठी चित्रपटाचे नाव बाबा असून हा चित्रपट मी माझ्या वडिलांना समर्पित करत आहे. ते संपूर्ण आयुष्यभर माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. या चित्रपटाची निर्मिती संजय दत्त प्रोडक्शच्या अंतर्गत केली गेली असून या चित्रपटाची निर्माती संजयची पत्नी मान्यता दत्त आणि अशोक सुभेदार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर गुप्ता यांनी केले असून ट्विटरद्वारे संजयने या चित्रपटाचे पोस्टर देखील लाँच केले आहे. या चित्रपटाच्या पोस्टवरवर एक लहान मुलगा त्याच्या वडिलांसोबत सायकलवर बसलेला दिसून येत आहे. भावनेला भाषा नसते अशी या चित्रपटाची टॅगलाईन असून हा चित्रपट २ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात कोणते कलाकार मुख्य भूमिकेत असणार याबाबत चित्रपटाच्या टीमने मौन राखणेच पसंत केले आहे.
संजय दत्तच्या आधी अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा या बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांनी देखील मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे.