संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बॉयफ्रेन्डच्या अनपेक्षित मृत्यूने त्रिशाला कमालीची हादरली असून २ जुलैला त्रिशालाच्या इटालियन बॉयफ्रेन्डचे अकाली निधन झाले. या घटनेनंतर त्रिशालाला स्वत:ला सावरणे कठीण जातेय. सोशल मीडियावर पोस्ट लिहून तिने तिचे दु:ख व्यक्त केले होते. माझे हृदय तुटले.. माझ्यावर प्रेम करण्यासाठी, माझी काळजी घेण्यासाठी आभार. तू मला कधी नव्हे इतका आनंद दिलास. तुला भेटून मी जगातील सर्वाधिक भाग्यशाली मुलगी ठरले. तुझी होऊन मी धन्य झाले. तू कायम माझ्यात जिवंत असशील. मी तुझ्यावर प्रेम करते आणि कायम करत राहील. आपण दोघेही पुन्हा भेटत नाही तोपर्यंत मी तुला मिस करत राहील. नेहमीसाठी फक्त तुझीच...तुझीच बेला मिया...,असे त्रिशालाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले होते.
त्रिशालाच्या बॉयफ्रेंडच्या निधनाला महिना उलटला असला तरी ती या दुःखातून बाहेर पडलेली नाहीये. तिच्या इन्स्टाग्रामवरील एका नव्या पोस्टमुळे ही गोष्ट आपल्या लक्षात येत आहे. तिने इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला जाण्यासाठी सजलेली असल्याचे दिसून येत आहे.
तिने या फोटोसोबत पोस्ट लिहिली आहे की, मैत्रिणीच्या लग्नाला जाण्यासाठी तयार व्हायचे, चेहऱ्यावर कायम हास्य ठेवायचे हे खरे तर माझ्यासाठी सोपे नव्हते. ही माझी मैत्रीण मला माझ्या बहिणीप्रमाणेच आहे. ती तिच्या लग्नात खूपच सुंदर दिसत होती. हा काळ माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट काळ आहे. पण तरीही मी मला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. मी तुला खूप मिस करत असून मी आजही तुझ्यावर तितकीच प्रेम करते.
त्रिशालाने काही महिन्यांपूर्वी ती एका इटालियन तरूणाला डेट करत असल्याचा खुलासा केला होता. बॉयफ्रेन्डसोबतचा एक फोटो शेअर करत तिने याबाबतचे संकेत दिले होते. ‘ एका इटालियनला डेट करणे म्हणजे, खूप सारा पास्ता आणि वाईन,’ असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते.