२०१८ साली रिलीज झालेला 'संजू' हा (sanju movie) सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. हा सिनेमा संजय दत्तचा (sanjay dutt) बायोपिक म्हणून ओळखला जातो. पण हा सिनेमा संजय दत्तची बहीणप्रिया दत्तला (priya dutt) आवडलेला दिसत नाही. प्रियाने एका मुलाखतीत 'संजू' सिनेमाविषयी तिची नाराजी व्यक्त केली. याशिवाय सिनेमात जी कथा दाखवण्यात आली, त्यावरही काहीशी नापसंती दर्शवली. काय म्हणाली प्रिया? जाणून घ्या
प्रिया यांना संजू आवडला नाही कारण...
प्रिया दत्त यांनी विकी लालवानी यांच्या यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘संजू’ हा चित्रपट खऱ्या अर्थाने बायोपिक वाटला नाही. या चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी योग्य पद्धतीने दाखवण्यात आल्या नाहीत. विशेषत: संजय दत्तचे त्याच्या कुटुंबासोबत आणि त्याच्या पालकांसोबत कसं नातं होतं, याचं चित्रण योग्य पद्धतीने दाखवलं गेलं नाही. चित्रपटात संजयच्या आयुष्याचा फक्त एक भाग दाखवण्यात आला. त्याच्या एका मित्रावर (विकी कौशल याने साकारलेली भूमिका) खूप जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले. हा मित्र संजयच्या खऱ्या आयुष्यातील अनेक मित्रांचे मिश्रण होते."
"मला नेहमी प्रश्न पडतो की, आमच्या कुटुंबावर आणि आमच्या आई-वडिलांवर सिनेमात इतके कमी प्रसंग का दाखवले? चित्रपटात आमची आई नर्गिस आणि वडील सुनील दत्त यांच्याबद्दल अत्यंत मोजके प्रसंग दिसले.”
त्यांनी पुढे सांगितले की, “रणबीरने संजयची भूमिका खूपच छान साकारली. पण मला वाटते की हा चित्रपट मनोरंजनासाठी जास्त होता. चित्रपट संजयच्या आयुष्यातील खरा संघर्ष आणि खोलवर जाणारी कहाणी दाखवण्यात कमी पडला,” प्रिया यांनी हेही सांगितले की, त्यांनी आपल्या भाऊ संजय दत्तला याबद्दल सांगितलं, पण त्याने फक्त “आता काय?” असं थंडपणे उत्तर दिले.
प्रिया यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानींसोबत याविषयी बोलण्याचा विचार केला होता, पण नंतर त्यांनी तसं केलं नाही. कारण चित्रपट निर्मात्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यामुळे त्यांनी संजयच्या आयुष्याचा एक ठराविक भाग दाखवण्यावरच भर दिला. “कदाचित त्यांना हा चित्रपट जास्त मनोरंजक बनवायचा होता, पण मला वाटते की यात चित्रपटात खूप गोष्टींची अतिशयोक्ती दाखवली गेली.” असेही त्या म्हणाल्या. अशाप्रकारे प्रिया यांनी त्यांचं स्पष्ट मत व्यक्त केलं.