बॉलिवूडमध्ये कपूर कुटुंबाची कायम चर्चा रंगत असते. गेल्या कित्येक वर्षांपासून या कुटुंबातील सदस्य इंडस्ट्रीत सक्रीय आहेत. त्यामुळे त्याच्याशी निगडीत कोणतीही गोष्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होते. सध्या या कुटुंबातील तीन भावंडांचा वाद चव्हाट्यावर आला आहे. अनिल कपूर, बोनी कपूर आणि संजय कपूर हे तीनही भावंडं कलाविश्वात सक्रीय आहेत. या संजय कपूरने नुकतीच एक मुलाखत दिली असून या मुलाखतीमध्ये त्याने बोनी कपूरवर काही आरोप केले आहेत. त्याच्या करिअरला ब्रेक मागे लागण्यामागे भाऊच जबाबदार असल्याचं त्याने म्हटलं आहे.
इंडस्ट्रीमध्ये अनिल कपूर आणि बोनी कपूर आजही यशस्वीरित्या सक्रीय आहेत. त्यांच्या तुलनेत संजय कपूरचं नाणं फारसं चाललं नाही. १९९५ मध्ये प्रेम या सिनेमातून त्याने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. मात्र, त्यानंतर इंडस्ट्रीत तो स्वत:ला टिकवू शकला नाही. याविषयी त्याने एका पॉडकास्टमध्ये बरेच खुलासा केले आहेत.
बोनी कपूरमुळे फ्लॉप झालं संजयचं करिअर
ज्यावेळी माझ्या करिअरचा कठीण काळ सुरु होता त्यावेळी माझा भाऊ बोनी कपूर याने एकाही सिनेमाची मला ऑफर दिली नाही. ज्यावेळी त्याने नो एन्ट्री हा सिनेमा केला त्यावेळी फरदीन खानऐवजी तो मला त्या भूमिकेत घेऊ शकला असता. पण, त्याने तसं केलं नाही. अनिल आणि सलमानची निवड खूप आधीच झाली होती. त्यामुळे तो सिनेमा तसाही हिट ठरणार होता. पण, जर मला त्यात घेतलं असतं तरी तो सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला असता. ज्याप्रमाणे त्यात गोष्टी घडल्या त्या त्याचप्रमाणेही नंतर घडल्या असत्या. फरदीनच्या ऐवजी मला घेतलं असतं तरी ‘नो एण्ट्री’ हा ब्लॉकबस्टर ठरला असता”, असं संजय म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "त्यावेळी फरदीन माझ्यापेक्षा जास्त चालणारा अभिनेता होता त्यामुळे त्याने माझ्या ऐवजी त्याला भूमिका ऑफर केली. गेल्या २० वर्षात मी माझ्या भावाच्या प्रोडक्शन अंतर्गत एकही काम केलेलं नाही. ज्यावेळी माझा कठीण काळ सुरु होता त्यावेळी त्याचं माझ्यावर प्रेम नव्हतं असं नाही. पण, शेवटी हा सगळा बिझनेसचा भाग झाला."
दरम्यान, संजयपूर्वी अनिल कपूरनेही बोनी कपूरविषयी नाराजी व्यक्त केली होती. एका मुलाखतीमध्ये त्याने नो एण्ट्रीच्या सीक्वेलविषयी भाष्य केलं होतं. अनिल कपूरला नो एण्ट्रीच्या सीक्वेलमध्ये काम करायचं होतं. मात्र, जेव्हा सीक्वेलच्या कलाकारांची नावं जाहीर झाली, तेव्हा त्यात त्यांचं नावंच नव्हतं. तेव्हापासून अनिल कपूरने बोनीसोबत अबोला धरला आहे.