सर्व राज्यांत रिलीज होणार ‘पद्मावत’, सर्वोच्च न्यायालयाचा संजय लीला भन्साळींना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 6:55 AM
संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’ या वादग्रस्त चित्रपटावर चार राज्यांनी लादलेल्या बंदीविरोधातील याचिकेवर आज गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान झाली. यादरम्यान ...
संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’ या वादग्रस्त चित्रपटावर चार राज्यांनी लादलेल्या बंदीविरोधातील याचिकेवर आज गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान झाली. यादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ‘पद्मावत’ला हिरवी झेंडी देत ‘पद्मावत’वर बंदी लादणा-या राज्यांचे चांगलेच कान टोचले. त्यामुळे येत्या २५ तारखेला हा चित्रपट आता सर्व राज्यांत प्रदर्शित होऊ शकेल. सेन्सॉर बोर्डाने पास केल्यानंतर कुठलेही राज्य कुठल्याही चित्रपटावर बंदी घालू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले. ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी ‘पद्मावत’च्या निर्मात्यांची बाजू लावून धरली. सेन्सॉर बोर्डाने ‘पद्मावत’ला संपूर्ण देशात चित्रपट प्रदर्शनासाठी प्रमाणपत्र जारी केले आहे. त्यामुळे काही निवडक राज्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी लादणे घटनाबाह्य असल्याचे त्यांनी म्हटले. याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेतल्यावर सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयानेही ‘पद्मावत’वर चार राज्याने घातलेली बंदी घटनाबाह्य ठरवली. एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडत असेल तर ही जबाबदारी राज्यांची आहे. हे राज्यांचे घटनात्मक कर्तव्य आहे. राज्य घटनेच्या कलम २१ ने लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले आहे. अशात ‘पद्मावत’ राज्यांनी बंदी लादण्याचा कुठलाही हक्क नाही. कायदा व सुव्यवस्थेच्या आडून राजकीय नफा-तोट्याचा खेळ सुरू आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.भाजपाशासित राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश व हरियाणा या चार राज्यांनी ‘पद्मावत’च्या प्रदर्शनावर बंदी लादली होती. ‘पद्मावत’च्या निर्मात्यांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.ALSO READ:‘पद्मावत’चा वाद पुन्हा सुप्रीम कोर्टात; चार राज्यांतील बंदीविरोधात निर्मात्यांची याचिकाश्री श्री रविशंकर यांचा पाठींबा‘पद्मावत’विरोधात देशभर रान माजले असताना आध्यात्मिक गुरु श्रीश्री रविशंकर यांनी या चित्रपटाला पाठींबा दर्शवला आहे. निर्मात्यांच्या वतीने श्री श्रींसाठी चित्रपटाची स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आल्याचे कळते. चित्रपट पाहिल्यानंतर आर्ट आॅफ लिव्हिंगचे सर्वेसर्वा श्री श्री रविशंकर यांनी या सिनेमावरून सुरु असलेला वाद निरर्थक असल्याचे म्हटले. चित्रपट अद्भूत आहे. आम्हाला अभिमान आहे. चित्रपटात कुठेही राणी पद्मावतीची अवहेलना झालेली नाही. चित्रपटात एकही अशी गोष्ट नाही, ज्यावर आक्षेप नोंदवला जावू शकेल. काही लोक या चित्रपटाला विरोध का करताहेत, हेच माझ्या आकलनापलिकडचे आहे, असे श्री श्री म्हणाले.