बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor) सध्या त्याच्या प्रोफेशनल आणि पर्सनल अशा दोन्ही गोष्टींमुळे चर्चेत येत आहे. एकीकडे चाहते वारंवार त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारत आहेत. तर दुसरीकडे रणबीरचा 'ब्रह्मास्त्र' (brahmastra) हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. अलिकडेच रणबीरने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याने कलाविश्वातील त्याच्या प्रवासावर एकंदरीत प्रकाश टाकला. यावेळी बोलत असताना प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (sanjay leela bhansali) यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव त्याने शेअर केला. केवळ इतकंच नाही तर भन्साळी यांनी अनेकदा मारहाण केल्याचंही त्याने सांगितलं.
काही दिवसांपूर्वी रणबीरने ‘राज कपूर : द मास्टर अॅट वर्क’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला हजेरी लावली होती. हे पुस्तक राज कपूर यांच्या आयुष्यावर बेतलेलं आहे. या कार्यक्रमात बोलत असतांना त्याने त्याचा कलाविश्वातील प्रवास सांगितला.
"सुरुवातीच्या काळात मी संजय लीला भन्साळी यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करायचो. त्यावेळी 'ब्लॅक' चित्रपटासाठी मी भन्साळींना असिस्ट करत होतो. मात्र, त्यांनी कधीच मला स्टारकिडची वागणूक दिली नाही. एका असिस्टंटला ज्याप्रमाणे वागवतात तसंच त्यांनी मला वागवलं", असं रणबीर म्हणाला.
पुढे तो म्हणाला, "मी तासनतास् त्यांच्यासमोर गुडघ्यावर बसून रहायचो. ते आम्हाला अनेकदा चुका झाल्यावर मारायचे. केवळ इतकंच नाही तर शिवीगाळही करायचे. पण, त्यांच्या याच गोष्टींमुळे आम्ही जगात जगण्यासाठी तयार होतो. माझ्या पिढीतील अनेक चित्रपट निर्माते फक्त व्यावसायिक पैलूंच्या मागेच धावत आहेत."
दरम्यान, आज बॉलिवूड गाजवणाऱ्या रणबीरने संजय लीला भन्साळी यांच्या सांवरियाँ या चित्रपटातूनच कलाविश्वात पदार्पण केलं होतं. हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रणबीरसोबत अभिनेत्री सोनम कपूरने स्क्रीन शेअर केली होती.