दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) प्रतिभावान दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांच्या प्रत्येक सिनेमाचं खास वैशिट्य असतं. भव्य सेट, तगडी स्टारकास्ट, अप्रतिम गाणी, उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी यामुळे सिनेमा हिट होण्याची गॅरंटीच असते. 19 वर्षांपूर्वी म्हणजेच 2005 साली त्यांनी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि राणी मुखर्जी (Rani Mukherjee) यांना घेऊन एक सिनेमा केला होता. तो चित्रपट आहे 'ब्लॅक' (Black). यामध्ये राणीने दिव्यांग मुलीची भूमिका साकारली तर अमिताभ बच्चन यांनी तिच्या शिक्षकाची भूमिका साकारली. दोघांच्या अभिनय पाहून प्रेक्षक प्रभावित झाले होते. 'ब्लॅक'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे इतक्या वर्षांनंतर आता हा सिनेमा ओटीटीवर आला आहे.
ब्लॅक सिनेमातमिशेल या एका दिव्यांग मुलीचा पदवीपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. अशी मुलगी जी ऐकू शकत नाही, बोलू शकत नाही आणि बघूही शकत नाही. या मुलीला प्रत्येक गोष्टीची जाणीव करुन देणे म्हणजे आव्हान असतं. हे आव्हान देबराज हा एक शिक्षक उचलतो आणि तिला ग्रॅज्युएट झालेलं बघणं एकप्रकारे त्याचंच ध्येय बनतं. मुलगी आणि शिक्षक यांची खूपच प्रेरणादायी गोष्ट या सिनेमातून दाखवण्यात आली आहे. तर हा सुपरहिट सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. नेटफ्लिक्सने 'ब्लॅक' चा एक व्हिडिओ शेअर करत लिहिले, "संजय लीला भन्साळी यांच्या ब्लॅक सिनेमाला 19 वर्ष पूर्ण झाली आहेत. आज आम्ही याच सिनेमाचं नेटफ्लिक्सवरील पहिलं डिजीटल रिलीज सेलिब्रेट करत आहोत. देबराज आणि मिशेल यांची गोष्ट सर्वांसाठीचस प्रेरणादायी आहे. आम्हाला आशा आहे की हा सिनेमा तुमच्यात सामर्थ्य आणि करुणा निर्माण करेल."
'ब्लॅक'चं संगीत ऐकून चाहते जुन्या आठवणीत रमले आहेत. सर्वांनीच याचा आनंद व्यक्त केला आहे. भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात उत्कृष्ट सिनेमांपैकी एक असा नेटकऱ्यांनी 'ब्लॅक'चा उल्लेख केला आहे. तर अनेकांनी हा सिनेमा ओटीटीवर येईल याची भविष्यवाणी आधीच केली होती असंही म्हटलं आहे. तसंच संजय लीला भन्साळी जेव्हा टॅलेंटेड अभिनेत्रींसोबत काम करायचे तो काळ असं म्हणत दीपिका पदुकोणवर निशाणा साधला आहे.
'ब्लॅक' सिनेमा २२ कोटींच्या बजेटमध्ये बनला होता तर सिनेमाने वर्ल्डवाईड तब्बल 66 कोटींची कमाई केली होती. सुरुवातीला राणी मुखर्जीने सिनेमा करण्यास नकार दिला होता. ही भूमिका साकारण्यासाठी ती असमर्थ असल्याचं तिला वाटलं होतं. तर अमिताभ बच्चन यांनी सिनेमात काम करण्यासाठी एकही रुपया घेतला नव्हता.