'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा हिट झाल्यानंतर आता दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या पुढच्या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. सध्या ते 'इंशाल्लाह'आणि 'बैजू बावरा' या दोन सिनेमांमुळे चर्चेत आहेत. दरम्यान आता भन्साळींचा 'बैजू बावरा' प्रोजेक्ट होल्डवर असून ते आता 'इंशाल्लाह'ची तयारी करत आहेत. काही दिवसांपूर्वी या सिनेमा सलमान खानचा पत्ता कट करुन शाहरुख खानला घेण्यात आल्याची चर्चा होती. पण आता सिनेमातून दोन्ही खानचा पत्ता कट झाला आहे. तर तिसऱ्याच अभिनेत्याने यात बाजी मारली आहे.
न्यूज ऑफ बॉलिवूडनुसार, संजय लीला भन्साळी हे रणबीर कपूरला घेऊन 'इंशाल्लाह' बनवणार अशी चर्चा आहे. माध्यम संस्थेने ट्वीट करत लिहिले,'संजय लीला भन्साळींनी त्यांचा पुढील सिनेमा इंशाल्लाहसाठी रणबीर कपूरला साईन केले आहे. सिनेमाचं शूट 2025 मध्ये सुरु होईल. तसंच दिग्दर्शकाने बैजू बावरा प्रोजेक्ट जून 2024 पर्यंत होल्डवर ठेवला आहे. याचं कारण हे की कोणताच स्टुडिओ 31 मार्च 2024 पूर्वी यासाठी 350 कोटी रुपये खर्च करायच्या तयारित नाही. तसंच संजय लीला भन्साळी या प्रोजेक्टसाठी 100 कोटींच्या खाली पैसे आकारायला तयार नाहीत. त्यांनी जिओ, झी, जयंतीलाल गडा, अप्लॉज, सोनी यांच्याशी संपर्क साधला मात्र सध्या कोणीही यासाठी राजी नाहीत.'
'इंशाल्लाह'च्या मेकर्सकडून किंवा रणबीर कपूरकडून अद्याप अधिकृत माहिती आलेली नाही. मात्र असं झालं तर रणबीर कपूर 'सावरिया' नंतर पुन्हा भन्साळींच्या सिनेमात दिसेल. रणबीरने संजय लीला भन्साळींच्या 'सावरिया' सिनेमातूनच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सिनेमातील गाणी सर्वांना प्रचंड आवडली मात्र चित्रपट सुपरफ्लॉप ठरला.