Join us

"घाई का केली धोंडू, आता कोणाला...", अतुल परचुरेंच्या निधनामुळे संजय मिश्रा भावुक!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 11:12 AM

अतुल परचुरे यांचं वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झालं आहे.

मराठी कलाविश्वातले दिग्गज अभिनेते अतुल परचुरे यांचं वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यामुळे संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. अतुल यांनी मराठी आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. पण त्याचबरोबर इंडस्ट्रीत स्वतःचं अग्रगण्य स्थानही निर्माण केलं. आता त्यांच्या निधनानंतर सिनेविश्वातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यांच्या बऱ्याच सहकारी मित्रांना दुःखद धक्का बसलाय. असेच एक त्यांचे मित्र बॉलिवूड अभिनेते संजय मिश्रा यांनी शोक व्यक्त केला.

 संजय मिश्रा आणि अतुल परचुरे यांनी अनेकदा एकत्र काम केलं आहे. दोघांमध्ये चांगली मैत्रीसुद्धा होती. 'ऑल द बेस्ट' सिनेमामधून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. या सिनेमातील त्यांचा 'धोंडू जस्ट चिल्ल'  हा संवाद खूप गाजला होता.  आता अतुल यांच्या अचानक निधनाची बातमी समोर आल्याने संजय मिश्रा यांना धक्का बसला आहे. त्यांनी सोशल मीडियावर अतुल यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहलं, "धोंडू एवढ्या लवकर निघून जाण्याची काय घाई होती... आता मी कोणाला म्हणू की जस्ट चिल्ल". संजय यांनी ट्विटर पोस्टमध्ये सिनेमतील सीनचा व्हिडिओही शेअर केला. 

अतुल परचुरे यांनी हिंदी चित्रपटांमध्ये काम करत मोठा पडदा गाजवला. अनेक सिनेमांमध्ये ते सह अभिनेत्याच्या भूमिकेत दिसले. त्यांच्या सलाम-ए-इश्क, पार्टनर, ऑल द बेस्ट: फन बिगिन्स, खट्टा मीठा, बुढ्ढा होगा तेरा बाप या सिनेमांमधील भूमिका प्रेक्षकांना आजही लक्षात आहेत. अतुल यांनी मराठीत कापूसकोंड्याची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, तुझं आहे तुजपाशी, नातीगोती, व्यक्ती आणि वल्ली अशा अनेक नाटकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय छोट्या पडद्यावरच्या 'जागो मोहन प्यारे', 'भागो मोहन प्यारे', 'अळी मिळी गुपचिळी', 'होणार सून मी ह्या घरची', 'माझा होशील ना' या त्यांच्या मालिका प्रचंड गाजल्या.  

टॅग्स :संजय मिश्राअतुल परचुरे