संजय दत्तच्या रॉकी या चित्रपटातील हे प्रसिद्ध गाणे प्रेक्षकांना ऐकायला मिळणार संजयच्या बायोपिकमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 7:22 AM
रॉकी या चित्रपटाद्वारे संजय दत्तने त्याच्या करियरला सुरुवात केली. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटातील ...
रॉकी या चित्रपटाद्वारे संजय दत्तने त्याच्या करियरला सुरुवात केली. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटातील त्याची आणि टीना मुनिमची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटातील सगळी गाणी देखील प्रचंड फेमस झाली होती. त्यामुळे संजयसाठी रॉकी हा चित्रपट खूप खास आहे. याच चित्रपटातील एका गाण्याचा समावेश संजय दत्तच्या बायोपिकमध्ये करण्याचा निर्णय या चित्रपटाचे निर्माते राजकुमार हिराणी यांनी केला आहे. रॉकी या चित्रपटातील क्या यही प्यार है हे संजय दत्त आणि टीना मुनिम यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले गाणे प्रचंड गाजले होते. या गाण्याला लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा आवाज लाभला होता. या गाण्याला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. तसेच या गाण्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. आता हेच गाणे प्रेक्षकांना संजय दत्तच्या बायोपिकमध्ये ऐकायला मिळणार आहे. रॉकी या गाण्यात आपल्याला स्त्री आणि पुरुष असा दोघांचा आवाज ऐकायला मिळाला होता. पण आता हे गाणे नव्याने रेकॉर्ड करण्यात येणार असून हे गाणे कोणतीही गायिका नव्हे तर एकटा गायक गाणार आहे. हे गाणे अरमान मलिक गाणार असून रणबीर कपूरवर हे गाणे चित्रीत केले जाणार आहे. एका थिम ट्रकप्रमाणे हे गाणे चित्रपटात आपल्याला अनेकवेळा ऐकायला मिळणार आहे. अरमान मलिक सध्या या गाण्यावर काम करत आहे. याविषयी तो सांगतो, क्या यही प्यार है गाणे एका वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे. हे गाणे लोकांना प्रचंड आवडत असल्याने माझ्यावर एक खूपच मोठी जबाबदारी आहे. आर डी बर्मन यांनी या गाण्याला संगीत दिले होते. हे आहे रोमँटिक साँगमधील सगळ्यात चांगल्या गाण्यांपैकी एक मानले जाते. त्यामुळे पुन्हा त्याच ताकदीचे संगीत देणे आणि किशोर कुमार यांसारखे ते गाणे गाणे हे आव्हानात्मक आहे. पण राजू हिरानी यांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपावली आहे. त्यामुळे मी माझ्याकडून खूप मेहनत घेत आहे. Also Read : संजय दत्तने या दिग्दर्शकासोबत काम करण्यास दिला नकार !