प्रख्यात संतूर वादक आणि संगीतकार पं. शिवकुमार शर्मा यांचं निधन झालंय. ते 84 वर्षांचे होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते किडनीच्या समस्येने त्रस्त होते आणि डायलिसिसवर होते.वयाच्या 13 व्या वर्षांपासून पंडितजींनी संतूर शिकण्यास प्रारंभ केला. आज संतूर या वाद्याला देशविदेशात लोकप्रियता मिळवून देण्याचं सारं श्रेय त्यांना जातं.
1967 मध्ये त्यांनी हरिप्रसाद चौरसिया आणि संगीतकार ब्रजभूषण काबरा यांच्यासोबत केलेला 'कॉल ऑफ द व्हॅली' नावाचा अल्बम भारतीय शास्त्रीय संगीतातील सर्वात मोठा हिट ठरला. 1955 मध्ये, त्यांनी बॉम्बे (सध्याचे मुंबई) येथे पहिला सार्वजनिक कार्यक्रम दिला. वर्षभरानंतर त्यांनी 'झनक झनक पायल बाजे' चित्रपटातील एका दृश्यासाठी पार्श्वसंगीत दिले. त्यांचा पहिला एकल अल्बम 1960 मध्ये रेकॉर्ड झाला.
2002 मध्ये त्यांनी 'जर्नी विथ अ हंड्रेड स्ट्रिंग्स: माय लाइफ इन म्युझिक' हे आत्मचरित्र प्रकाशित केले. ते भारताच्या कानाकोपऱ्यातून आणि जपान, जर्मनी, ऑस्ट्रेलियातून आलेल्या विद्यार्थ्यांना फी न आकारता गुरूंच्या परंपरेनुसार संतूर शिकवत आणि अमेरिकेसारख्या जगाच्या विविध भागातून ते शिकायला शिष्य त्यांच्याकडे येत.
त्यांना मिळालेले पुरस्कार पंडित शिवकुमार शर्मा यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यात 1986 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1991 मध्ये पद्मश्री तर 2011मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. यासोबतच त्यांना 1985 मध्ये बाल्टिमोर या संयुक्त राज्याचं मानद नागरिकत्वही प्रदान करण्यात आलं आहे.