‘मीटू’ मोहिमेचे बॉलिवूडमध्ये तीव्र पडसाद उमटत असताना या निमित्ताने आरोप-प्रत्यारोपही रंगत आहेत. कालचं आपल्या वाढदिवसी महानायक अमिताभ बच्चन यांनी ‘मीटू’ मोहिमेला पाठींबा जाहिर केला होता. पण त्याआधी तनुश्री दत्ता-नाना पाटेकर या वादावर बोलणे अमिताभ यांनी सोयीस्कररित्या टाळले होते.
‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’च्या ट्रेलर लॉन्चवेळी अमिताभ यांना तनुश्री-नाना वादावर प्रतिक्रिया विचारली होती. यावर उत्तर देताना ना मी तनुश्री आहे, ना नाना पाटेकर. मग मी यावर काय बोलू, असे अमिताभ म्हणाले होते. अमिताभ यांच्या या प्रतिक्रियेवर तनुश्रीने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. हे मोठे स्टार सामाजिक मुद्यावर चित्रपट बनवतात. पण खºया आयुष्यात अशा एखाद्या मुद्यावर बोलायची वेळ आली की, मागे लपतात, असे ती म्हणाली होती. पण काल अमिताभ यांनी अचानक ‘मीटू’ मोहिमेला पाठींबा दिला. ‘कुणालाही कुठल्या महिलेसोबत गैरवर्तन करण्याचा अधिकार नाही. कामाच्या ठिकाणी तर अजिबात नाही. अशा मुद्यांवर त्वरित आवाज उचलून कायदेशीर मदत घेऊन आरोपीला शिक्षा द्यायला हवी. कामाच्या ठिकाणी महिलांना आदर मिळत नसेल तर हा एक अक्षम्य गुन्हा आहे, असे ‘मीटू’चे समर्थन करताना अमिताभ यांनी म्हटले होते. पण सेलिब्रिटी हेअर स्टाईलिस्ट सपना भवनानी हिला मात्र अमिताभ यांचा हा पाठींबा फार रूचला नाही.