अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मुलगी सारा अली खान हिचा आज वाढदिवस असून तिने खूपच कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये तिची जागा निर्माण केली आहे. आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याने मन जिंकणारी सारा कमालीची नम्र आहे. तिच्या या नम्र स्वभावामुळे सगळीकडून तिचे कौतुक होत असते.
साराच्या सौंदर्यावर आज अनेकजण फिदा आहेत. साराच्या फिगरचे चांगलेच कौतुक तिचे चाहते करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, एकेकाळी साराचे वजन ९० किलो होते. तिने अतिशय मेहनतीने तिचे वजन कमी केले आहे. साराला Polycystic ovary syndrome (PCOD) चा त्रास असल्याने तिचे वजन काही केल्या कमी होत नव्हते. पण वजन कमी करायचे या तिच्या निर्णयावर ती ठाम होती. तिने खूप सारा व्यायाम आणि डाएट करत दीड वर्षांत २० किलो वजन कमी केले.
साराने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, मी वजन कमी करण्यासाठी दररोज व्यायाम करत होती. पण त्याचसोबत मी वजन कमी करण्यासाठी कथ्थक, योगा यांसारख्या गोष्टी देखील केल्या. मी माझे डाएट देखील पूर्णपणे बदलले. पिझ्झा, चॉकलेट हे जीभेचे चोचले पुरवणाऱ्या पदार्थांना कायमचा रामराम ठोकला आणि मी जास्तीत जास्त भर सलाडवर द्यायला लागले. तसेच ज्या पदार्थातून प्रोटिन मिळेल, असे पदार्थ मी जास्तीत जास्त खायला सुरुवात केली.
साराने केदारनाथ या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. तिच्या पहिल्याच चित्रपटातील भूमिकेचे कौतुक झाले होते. त्यानंतर ती सिम्बा या चित्रपटात झळकली. या चित्रपटातील तिचा अभिनय देखील प्रेक्षकांना भावला. ती आता लवकरच कार्तिक आर्यन सोबत लव्ह आज कल २ मध्ये झळकणार आहे. सध्या तिच्या व्यवसायिक आयुष्याइतके तिचे खाजगी जीवन देखील चर्चेत आहे. कार्तिक आर्यनसोबत तिचे अफेअर सुरू असल्याच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात रंगल्या आहेत. पण तिने यावर मौन राखणेच पसंत केले आहे.