'केदारनाथ' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे सारा अली खान (sara ali khan). २०१८ मध्ये सुशांत सिंह राजपूतसोबत (sushant singh rajput) साराने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं. विशेष म्हणजे अवघ्या काही वर्षांमध्ये तिने तुफान लोकप्रियता मिळवली. त्यामुळेच आज बॉलिवूडच्या टॉप अॅक्ट्रेसमध्ये तिच्या नावाचा समावेश केला जातो. आजवर साराने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. यात काही सिनेमा सुपरहिट झाले. तर, काही बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले. मात्र, तिचे सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर इंडस्ट्रीतील काही लोकांनी तिला चुकीची वागणूक द्यायला सुरुवात केली होती.
अलिकडेच साराने 'बॉलिवूड लाइफ'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला. 2018 मध्ये केदारनाथ या सिनेमातून डेब्यू केल्यानंतर मला इंडस्ट्री आणि प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं. पण, त्यानंतर माझे काही सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. त्यावेळी लोकांनी मला कमीपणा दाखवायला सुरुवात केली, असं सारा म्हणाली.
पुढे ती म्हणते, "जे लोक मला पार्ट्यांना आमंत्रित करायचे. तेच लोक मी त्यांच्या पार्ट्यांमध्ये गेले काय किंवा नाही गेले काय त्यांना काहीही फरक पडत नव्हता. त्यांचं वागणं खूप बदललं होतं. पण, या सगळ्याची मला हळूहळू सवय व्हायला लागली. यश-अपयश दोन्हीही जीवनाचा एक भाग आहे हे मी एक्सेप्ट केलं. २०१८ मध्ये मला जी लोकप्रियता मिळाली ती पाहून मी जगात खूप लोकप्रिय झालीये असं मला वाटत होतं. मात्र, त्यानंतर मला जोरात जमिनीवर आदळलं गेलं. लोक पार्टी, डिनरला वगैरे माझ्यासोबत नीट वागत नव्हते. आधी सांगायचे सारा तुला काहीही करुन पार्टीला यायचंय. आणि, नंतर तेच म्हणायला लागले. तू आलीस तरी चालेल."
दरम्यान, या मुलाखतीमध्ये तिने जान्हवी कपूरसोबत होणाऱ्या तुलनेवरही भाष्य केलं. जान्हवीसोबत तुलना होते त्यावेळी मला काहीच वाटत नाही. कारण, प्रत्येकाच्या नशीबात असतं तेच त्याला मिळतं, असं म्हणत साराने तिचं मत व्यक्त केलं