Join us

"मला सिनेमातून काढून टाका", सारा अली खान दिग्दर्शकाला स्पष्टच बोलली; नेमकं कोणत्या गोष्टीला घाबरली? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 7:41 PM

बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या आगामी 'गॅसलाइट' सिनेमाच्या निमित्तानं चर्चेत आहे. सध्या सिनेमाचं जोरदार प्रमोशन केलं जात आहे.

नवी दिल्ली-

बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या आगामी 'गॅसलाइट' सिनेमाच्या निमित्तानं चर्चेत आहे. सध्या सिनेमाचं जोरदार प्रमोशन केलं जात आहे. पण यासोबतच सारानं तिच्या याआधीच्या सिनेमांतील चुकांवरही मनमोकळेपणानं भाष्य केलं आहे. सततच्या फ्लॉप सिनेमांमधील स्वत:चा अभिनय पाहून सारा अली खान घाबरली होती असं तिनं एका मुलाखतीत म्हटलं आहे. इतकंच नव्हे, तर सारानं थेट आपल्या आगामी सिनेमासाठी दिग्दर्शकाला फोन करुन आपल्याला सिनेमातून काढून टाकण्यात यावं असं सांगून टाकलं होतं. 

सारा अली खान हिचे 'लव आज कल' आणि 'कुली नंबर १' सिनेमे बॉक्स ऑफीसवर फ्लॉप ठरले. सारानं सांगितलं की कोविडच्या काळात तिनं हे दोन्ही सिनेमे पाहिले आणि आपण किती खराब अभिनय करत आहोत ते पाहिलं. याच काळात तिचा 'अतरंगी रे' सिनेमा येऊ घातला होता. तिला आपल्या खराब कामाबाबत इतकं वाईट वाटत होतं की ती खूप घाबरली होती. सारानं थेट दिग्दर्शकाला फोन केला आणि चित्रपटातून स्वत:ला काढून टाकण्याचा सल्ला दिला. 

"माझे लागोपाठ सिनेमे फ्लॉप ठरत होते. त्यावेळी असं नेमकं काय होतंय तेच मला कळत नव्हतं. मी माझ्याज जगात मग्न होते. खरंतर असं व्हायला नको. सत्याची जाणीव होणं गरजेचं होतं. जेव्हा मी 'लव्ह आज कल' सिनेमा पाहिला तेव्हा लक्षात आलं की मी खूप वाईट काम केलं आहे. 'कूली नंबर १' सिनेमा देखील तसाच वाटला. मला माझ्या चुका लक्षात घेतल्या पाहिजेत असं मला तेव्हा समजलं", असं सारा अली खान म्हणाली. 

दिग्दर्शकाला फोन करुन स्वत:लाच काढून टाकायला सांगितलं"लव्ह आज कल सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर मला अनेक गोष्टी लक्षात आल्या. मी दिग्दर्शक आनंद एल राय यांना फोन केला. त्यांना म्हटलं की 'अतरंगी रे' सिनेमात माझ्या जागी दुसरं कुणाला तरी घ्या. कारण मी इतकी मोठी भूमिका साकारू शकत नाही. कारण माझा याआधीचा सिनेमा फ्लॉप झाला आहे", असं सारा अली खान मुलाखतीत म्हणाली. 

त्यावेळी दिग्दर्शक आनंद यांनी सारा अली खानचा आत्मविश्वास वाढवला. "जेव्हा तुम्ही पडता तेव्हा तुम्हाला फक्त उभं राहायचं नसतं तर उठून धावायचं देखील असतं. आता हाच सिनेमा असा आहे की ज्यामधून तू स्वत:ला सिद्ध करू शकतेस. त्यामुळे तू हा सिनेमा आवर्जुन करावास असं मला वाटतं", असं दिग्दर्शक आनंद म्हणाले.

टॅग्स :सारा अली खान