काही दिवसांपूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेटर शुबमन गिलचा एक फोटो व्हायरल झाला होता. वर्ल्डकप दरम्यान व्हायरल झालेल्या या फोटोत साराने शुबमनच्या गळ्यात हात टाकलेला दिसत होता. एक्सवरील एका युजरच्या अकाऊंटवरुन हा फोटो पोस्ट करण्यात आला होता. पण, हा फोटो डीपफेक असल्याचं उघड झालं होतं. आता पहिल्यांदाच साराने याबाबत भाष्य केलं आहे.
साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. "सोशल मीडिया हा आपल्या सगळ्यांचा आनंद, दु:ख आणि दैनंदिन घडामोडींबद्दल व्यक्त होण्याचा चांगला प्लॅटफॉर्म आहे. पण टेक्नोलॉजीच्या चुकीच्या वापराने सत्य आणि खरेपणा दूर जात आहे, हे काळजीत टाकणारं आहे. माझ्या व्हायरल झालेल्या डीपफेक फोटोंबाबत मला कळलं. माझ्या नावाने एक्सवर सुरू असलेलं अकाऊंट हे पॅरेडी अकाऊंट आहे. त्यांनी स्वत: त्यांच्या बायोमध्ये तसं म्हटलं आहे. पण लोकांची दिशाभूल करण्यासाठी ते पोस्ट क्रिएट करतात. माझं एक्सवर कोणतंही अकाऊंट नाही. एक्स अशा अकाऊंटविरुद्ध कारवाई करेल, अशी अपेक्षा आहे. मनोरंजनासाठी सत्याला किंमत मोजावी लागू नये. विश्वास आणि खरेपणाच्या संवादाला प्रोत्साहन देऊया," असं साराने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान साराचा शुबमन गिलबरोबरचा व्हायरल झालेला फोटो हा डीपफेक होता. साराने तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकरबरोबर तिच्या सोशल मीडियावरुन काही फोटो शेअर केले होते. या फोटोमधील एका फोटोत अर्जुनचा फोटो एडिट करून त्यावर शुबमनचा चेहरा लावण्यात आला होता.