Join us

रणदीप हुड्डाने पूर्ण केलं दलबीर यांना दिलेलं वचन; सरबजीत यांच्या बहिणीला दिला मुखाग्नि

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 6:16 PM

Randeep hooda: 'माझ्या मृत्यूनंतर मला खांदा दे', असं वचन दलबीर यांनी रणदीपकडे मागितलं होतं. हे वचन रणदीपनेही पूर्ण केलं.

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू झालेल्या सरबजीत सिंग (Sarabjit Singh) यांच्या बहिणीचं दलबीर कौर (Dalbir Kaur) यांचं शनिवारी निधन झालं. वयाच्या साठाव्या वर्षी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. दलबीर यांचं निधन झाल्यानंतर अभिनेता रणदीप हुड्डा (randeep hooda) याने तातडीने पंजाबच्या दिशेने रवाना होत त्यांच्या अंतिम कार्यात सहभागी झाला. इतकंच नाही तर त्याने दलबीर यांना खांदा दिला असून मुखाग्नीदेखील दिला. विशेष म्हणजे ५ वर्षांपूर्वी रणदीपने दलबीर यांना दिलेलं वचन पूर्ण केलं. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या घटनेचे फोटो व्हायरल होत आहेत.

२०१६ मध्ये सरबजीत सिंह यांच्यावर आधारित बायोपिकची निर्मिती करण्यात आली होती. या बायोपिकमध्ये रणदीपने सरबजीत यांची भूमिका साकारली होती. तर, दलबीर कौर यांची भूमिका अभिनेत्री ऐश्वर्या  राय बच्चन हिने केली होती. या चित्रपटात रणदीपचा अभिनय पाहून भारावून गेलेल्या दलबीर कौर यांनी खऱ्या आयुष्यातही रणदीपला आपलं भाऊ मानलं होतं. त्यामुळेच माझ्या मृत्यूनंतर मला खांदा दे असं वचन त्यांनी रणदीपकडे मागितलं होतं. विशेष म्हणजे ५ वर्षांनी रणदीपनेही हे वचन पूर्ण केलं.

"मला रणदीपला एक गोष्ट सांगायची आहे. त्याच्यात मला माझा भाऊ सरबजीत सापडला आहे. माझी एकच इच्छा आहे आणि त्यामुळेच मला त्याच्याकडून एक वचन हवंय. ज्यावेळी माझं निधन होईल त्यावेळी त्याने मला खांदा द्यावा. माझ्या भावानेच मला खांदा दिला असं समजून माझ्या आत्म्याला शांती मिळेल. तो फक्त चित्रपटात हिरो नाही तर माझा भाऊ देखील आहे"असं म्हणत दलबीर यांनी रणदीपला आपलं भाऊ मानलं होतं.

दलबीर यांचं निधन झाल्याची माहिती रणदीपला मिळताच त्याने तातडीने मुंबई सोडून पंजाब गाठलं आणि दलबीर यांना खांदा दिला. तसंच त्यांना मुखाग्नीदेखील दिला. सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी दलबीर यांच्या छातीत अचानकपणे दुखू लागलं त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

दरम्यान, सरबजीत सिंग यांना पाकिस्तानी न्यायालयाने दहशतवाद आणि हेरगिरीसाठी दोषी ठरवलं होतं आणि 1991 मध्ये त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, 2008 मध्ये सरकारने सरबजीत सिंग यांच्या फाशीला अनिश्चित काळासाठी स्थगिती दिली होती. यानंतर एप्रिल 2013 मध्ये लाहोरमध्ये कैद्यांनी केलेल्या हल्ल्यात सरबजीत सिंग यांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :रणदीप हुडासेलिब्रिटी