कलाकार सोशल मीडियावर सक्रीय झाले असून ते या माध्यमातून आपल्या चाहत्यांना आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगत असतात आणि त्यांच्याशी संवाद साधत असतात. त्यात सैफ अली खान व अम्रिता सिंगची मुलगी सारा अली खानने सोशल मीडियावर आपले अकाउंट सुरू करावे अशी तिच्या चाहत्यांची इच्छा होती. त्यासाठी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर #SaraPlzComeOnSocialMedia हा हॅशटॅग जोरदार ट्रेण्ड होत होता. चाहत्यांच्या या विनंतीला मनावर घेत साराने अखेर आपले इंस्टाग्राम अकाउंट सुरू केले आहे. खरेतर सारा तिच्या वाढदिवसादिवशी सोशल मीडियावर एन्ट्री करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र तिने देशाच्या वाढदिवसापेक्षा दुसरा कोणताच दिवस महत्त्वाचा नाही असे म्हणत इंस्टाग्रामवर पदार्पण केले आहे.
साराने इंस्टाग्रामवर अकाऊंट सुरू केल्याच्या तासाभरातच तिचे जवळपास एक लाख फॉलोअर्स झाले. इंस्टाग्रामवर साराने स्वातंत्र्यदिनानिमित्त रविंद्रनाथ टागोर यांच्या फोटोसह ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत पोस्ट केले आहे.
सारा ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘केदारनाथ’मध्ये सारा अली खान सुशांत सिंग राजपूतसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. ‘केदारनाथ’ हा चित्रपट २०१३ मध्ये केदारनाथमध्ये आलेल्या प्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. चित्रपटात सारा एका साध्या सरळ मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे. हा दोघांची लव्हस्टोरी या चित्रपटात बघायला मिळणार आहे. सारा एका श्रीमंंत घरातील मुलगी असते आणि पिठ्ठू तिच्या प्रेमात पडतो, असे याचे कथानक आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तिला रोहित शेट्टीचा दुसरा बिग बजेट चित्रपटसुद्धा मिळाला आहे. त्यामुळे चाहते साराला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.