ए. आर. मुरुगदास दिग्दर्शित ‘सरकार’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटामुळे तामिळनाडूमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहेअण्णाद्रमुकच्या (दिवंगत नेत्या जयललिता यांचा पक्ष) या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी या चित्रपटाला कडाडून विरोध केला आहे. द्रमुकचे (दिवंगत नेते करूणानिधी यांचा पक्ष) कलानिधी मारन हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटातील काही दृश्ये आणि संवाद अण्णाद्रमुकच्या विरोधात असल्याचा दावा, अण्णाद्रमुकच्या नेत्यांनी केला आहे. या चित्रपटात एक खलनायिका दाखवण्यात आली असून महिला मुख्यमंत्र्याचे हे पात्र जयललिता यांच्यावर आधारीत असल्याचा अण्णाद्रमुकचा दावा आहे. या पात्राच्या तोंडचे संवादही आक्षेपार्ह असल्याचे या पक्षाने म्हटले आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होताच या पक्षाच्या नेत्यांची, आमदारांनी चित्रपटगृहांच्या बाहेर निदर्शने सुरू केली आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक ए आर मुरुगदास यांना अटक करण्यासाठी हालचाली सुरु असल्याचेही वृत्त आहे. शुक्रवारी सकाळी पोलिस मुरूगदास यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी गेलेत. पण ते घरी सापडले नाहीत, असेही वृत्त आहे. देवराजन नावाच्या व्यक्तिने मुरुगदास यांच्याविरोधात एफआयआर दाखल केल्याचेही कळतेय. याचदरम्यान मुरूगदास यांनी अंतरिम जामीनासाठी मद्रास उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.अभिनेता विजयची मुख्य भूमिका असलेला सरकार चित्रपट गत ६ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. दोन दिवसांतच या चित्रपटाने १०० कोटींपेक्षा जास्तीची कमाई केली. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी तमिळनाडूमधील मंत्री कादंबूर राजू यांनी वादग्रस्त दृश्ये हटवण्याचा इशारा दिला होता.
‘सरकार’ चित्रपटामुळे तामिळनाडू तापले! जाणून घ्या काय आहे वाद!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2018 1:45 PM