बॉलिवूडच्या दिग्गज कोरिओग्राफर सरोज खान यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सरोज खान यांचे सुरुवातीचे आयुष्य अनेक अडचणींनी भरलेले होते. सुरुवातीच्या काळात त्यांच्या वाट्याला मोठा संघर्ष आला. पण सरोज यांनी हिंमतीने या अडचणींवर मात करत, इंडस्ट्रीत स्वत:ची एक ओळख निर्माण केली. एका ताज्या मुलाखतीत सरोज खान यांची मुलगी सुकैना नागपाल हिने आईच्या काही आठवणी शेअर केल्यात.
सुकैना म्हणाली, माझी आई प्रचंड स्वाभीमानी स्त्री होती. तिने कधीच लोकांचा एक पैसाही बुडवला नाही. सर्वांची पै अन् पै तिने चुकवली. इतकेच नाही तर तिचा अंत्यविधीही तिच्या स्वत:च्या पैशांनी झाला. आईच्या दफनविधीनंतर दफनभूमीत पैसे देण्याची वेळ आली तेव्हा घाईघाईत आम्ही पैसे आणायला विसरल्याचे मला व माझ्या पतीला लक्षात आले. गाडी आणि ड्रायव्हरही आमच्या जवळ नव्हते. तेव्हा अचानक मी माझी पर्स चेक केली आणि त्यातून 3 हजार रूपये निघाले. हे 3 हजार रूपये आईनेच मला दिले होते. लॉकडाऊनआधी कुठल्या तरी कामासाठी तिने मला हे पैसे दिले होते. ती इतकी स्वाभीमानी होती की, स्वत:च्या कफनाचे पैसेही ती देऊन गेली.
आईला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे कोरोना झाला असे समजून ती आम्हा सर्वांपासून दूर राहण्याचे प्रयत्न करत होती. आम्ही तिची कोरोना टेस्ट केली, तेव्हा ती निगेटीव्ह आली होती, असेही सुकैनाने सांगितले.
वयाच्या 71 व्या वर्षी सरोज यांनी जगाचा निरोप घेतला. सरोज यांनी आपल्या करिअरमध्ये 2000 वर गाणी कोरिओग्राफ केली होती. सरोज खान यांचे वयाच्या 13 व्या वर्षी लग्न झाले आणि वयाच्या 14 व्या वर्षी त्या आई झाल्या. त्यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि मग त्यांनी एकटीने मुलांचासांभाळ केला.