Join us

श्रीदेवी, माधुरी ते करिना ... सरोज खान यांनी कोरिओग्राफ केलेली काही आयकॉनिक गाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 10:28 AM

सरोज खान यांच्या तालावर नाचणे म्हणजे अनेकजण भाग्य समजायचे. या यादीमध्ये माधूरी, श्रीदेवी, ऐश्वर्या यासारख्या मोठमोठ्या नावांचा सामावेश होता.

प्रसिद्ध बॉलीवूड कोरिओग्राफर   सरोज खान यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सरोज यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक बड्या कलाकारांना आपल्या तालावर नाचवले.  किंबहुना त्यांच्या तालावर नाचणे म्हणजे अनेकजण भाग्य समजायचे. या यादीमध्ये माधूरी, श्रीदेवी, ऐश्वर्या यासारख्या मोठमोठ्या नावांचा सामावेश होता. अर्थपूर्ण, दिलखेचक स्टेप्स आणि नृत्याविष्काराचा आदर्श असेच त्यांच्या कोरिओग्राफीचे वर्णन करावे लागेल.

आज पाहुयात त्यांनी कोरिओग्राफ केलेली काही आयकॉनिक गाणी पाहुयात...

* धक धक करने लगा

                     

या गाण्याविषयी अधिक काही सांगण्याची गरज नाही.‘बेटा’ चित्रपटातील या गाण्याने लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडीत काढलेले आहेत. अनिल कपूर आणि माधुरीची केमिस्ट्री म्हणजे ए-वन.

* काटे नहीं कटते : 

                                   

‘मि. इंडिया’ चित्रपटातील या गाण्यातील श्रीदेवी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. निळ्या साडीमधील तिचे मादक नृत्य हिंदी सिनेमातील सर्वोत्तम मानले जाते. याचे श्रेय जाते ते सरोज खान यांना.

* एक - दोन - तीन

                 

‘तेजाब’ चित्रपटातील हे गाणे माहित नसणार व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. माधुरीला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवणा-या या गाण्याच्या स्टेप्स सरोज खान यांच्या क्रिएटिव्ह डोक्यातून निर्माण झालेल्या आहेत. पुढे ‘डान्सिंग क्वीन’ म्हणून माधुरी ओखळली जाऊ लागली ती याच गाण्यामुळे.

* ना जाने कहां से  

                                    

श्रीदेवीवर चित्रित झालेल्या या गाण्यासाठी सरोज यांना बेस्ट कोरिओग्राफीचा लागोपाठ दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. ‘चाल बाज’ चित्रपटातील हे रेन डान्स साँग आजही आवडीने ऐकले जाते.

* चोली के पिछे क्या है

                                  

‘खलनायक’ चित्रपटातील हे गाणे म्हणजे बॉलीवूडमधील ‘टाईमलेस’ गाण्यांपैकी एक आहे. ओठांवर खिळणारी चाल व शब्दांबरोबरच सरोज यांच्या स्टेप्सवर थिरकलेल्या माधूरीमुळे हे गाणे आयकॉनिक बनले.

* डोला रे डोला

                                     

माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांचे ‘नृत्य द्वंद’ म्हणजे डान्सप्रेमींसाठी पर्वणीच. भंसाळीच्या ‘देवदास’ला ‘यादगार’ बनवण्यामध्ये सरोज खान यांच्या या गाण्याचा खूप मोठा हात आहे. चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर गाणे म्हणूनही ‘डोला रे डोला’ मानले जाते.

* ये इश्क हाए

                                      

‘जब वुई मेट’मधील या गाण्यात करिना कपूर ज्या प्रकारे नाचली आहे ते पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडेल. या हॅपी गाण्याला ख-या अर्थाने जिवंतपणा आणला   तो सरोज यांच्या स्टेप्समुळे. 

टॅग्स :सरोज खान